पारनेर :  शिक्षण क्षेत्रात नामांकित असलेल्या अमेरिकेतील न्यूजर्सी येथील डय़ू युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेण्यासाठी तालुक्यातील पळसपूर येथील श्रेया रंगनाथ आहेर या विद्याथर्नीस १ कोटी ५० लाख रुपयांची शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे. भारतातील ४ हजार विद्यार्थ्यांमधून श्रेयाने हा बहुमान पटकावला आहे.

पारनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर यांची कन्या असलेल्या श्रेया हिने मुंबईतील नेक्स्टा जिनिअस फाउंडेशनच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या चाचणी परीक्षेत सर्वच क्षेत्रात अलौकिक कामगिरी साधून या यशाला गवसणी घातली. शहरातील पारनेर पब्लिक स्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुण्यातील विश्?वशांती गुरूकुल येथे केंब्रिज विद्यापीठाच्या इंटरनॅशनल बेकेलोरेट या अभ्याक्रमाचे श्रेया सध्या शिक्षण घेत आहे. आजवरच्या शिक्षणात मिळविलेली सातत्यपूर्ण गुणवत्ता, जर्मन व फ्रेंच भाषेचे शिक्षण, गेल्या वर्षी इंदोर येथे पार पडलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील सहभाग, बाली (इंडोनेशिया), जेकब्स विद्यापीठ ब्रेमेन (जर्मनी) तसेच नगरच्या स्नेहालय येथे इंटरशिप प्रोग्राममधील उत्स्फूर्त सहभाग, रक्तदान शिबिरातील जाणीव जागृती आदींची दखल घेतानाच लेखी व प्रत्यक्ष मुलाखतीच्या आधारावर श्रेयाची या शिष्यवृत्तीसाठी निवड  झाली. डय़ू युनिव्हर्सिटीचे डॉ. रेडिक कॉफेल यांनी तिला निवडीचे पत्र दिले. बारावीच्या अभ्यासक्रमानंतर अमेरिकेमध्ये इंटरनॅशनल रिलेशन हा अभ्यासक्रम श्रेया पूर्ण करणार आहे.

ग्रामीण भागात शिक्षण घेऊन उत्तुंग यश प्राप्त करीत अतिउच्च स्कॉलरशिप प्राप्त केल्याबद्दल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, आ. नीलेश लंके, मा. आ. नंदकुमार झावरे, मा. आ. विजय औटी, जी. डी. खानदेशे, सीताराम खिलारी, राहुल झावरे, एमआयटीचे संचालक राहुल कराड, प्राचार्य गीताराम म्हस्के, डॉ. दिलीप ठुबे, काशिनाथ दाते, रावसाहेब रोहोकले, संभाजी औटी  यांच्यासह तालुका पत्रकार संघाच्या वतीने श्रेया हिचे अभिनंदन करण्यात आले.