एजाज हुसेन मुजावर

गेले आठ-नऊ महिने करोना प्रादुर्भावामुळे अनेक छोटय़ा-मोठय़ा यात्रा, जत्रा, उरूस साजरे करताना शासकीय नियमांची बंधने आली आहेत. पंढरपूरची आषाढी व कार्तिकी यात्रांसह तुळजापूरचा नवरात्रोत्सव यासह अनेक यात्रांना करोनाचा फटका बसला आहे. करोनासंकट अद्यापही दूर झाले नसले तरी सोलापुरात मात्र ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेला परवानगी मिळण्याच्या मुद्दय़ावर लोकप्रतिनिधींमध्ये कुरघोडय़ांचा खेळ सुरू झाला आहे.

येत्या १२ ते १६ जानेवारी या कालावधीत सिद्धेश्वर यात्रा होणार आहे. इतर अनेक छोटय़ा-मोठय़ा यात्रा, उत्सवांसाठी कोणतीही जोखीम न पत्करता जे कठोरनिर्बंध लागू करण्यात आले, तसे निर्बंध सिद्धेश्वर यात्रेसाठीही लागू होणे स्वाभाविक आहे. त्यादृष्टीने स्थानिक प्रशासनाने यात्रा आराखडा तयार केला आहे. त्यानुसार यात्रेत केवळ पारंपरिक धार्मिक विधी पार पाडता येतील. त्यासाठी भाविक तथा यात्रेकरूंची अनियंत्रित गर्दी जमा करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. परंतु यात्रेत धार्मिक विधी पूर्ण करण्यासाठी सुमारे एक हजारांचा जमाव सहभागी होण्यासाठी परवानगी मिळावी, असा आग्रह सिद्धेश्वर देवस्थान समितीसह देवस्थानाच्या प्रमुख पुजारी मंडळींनी धरला आहे.

ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या योगदंडाचे पूजन, अक्षता सोहळा, होम प्रदीपन आदी पारंपरिक धार्मिक कार्यक्रमांसाठी उपस्थितांची मर्यादा आणि करोना विषाणू संसर्ग प्रादुर्भाव रोखण्याशी संबंधित नियमावलींच्या अधीन राहून प्रशासनाने यात्रा नियोजन आराखडा तयार केला आहे. यात शहराच्या पंचक्रोशीत ६८ लिंगांच्या प्रदक्षिणेसाठी नंदीध्वजांच्या मिरवणुकांना परवानगी मिळणार नाही. प्रतीकात्मक स्वरूपात सिद्धेश्वर महाराजांचा ‘योगदंड’ नेता येऊ शकेल. प्रशासनाच्या बंधनामुळे होम मैदानावर यात्रा भरणार नाही.

सिद्धेश्वर देवस्थान समितीचे विश्वस्त, पुजारी आणि मानकरी अशा निवडक सुमारे ५० प्रतिनिधींच्या उपस्थितीत यात्रा सोहळा पार पाडण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. त्यास देवस्थान समितीसह मानकरी व पुजारी मंडळींनी आक्षेप घेत एक हजार जनसमुदायाला यात्रेतील सर्व धार्मिक विधींमध्ये सहभागी होण्यासाठी परवानगी मिळावी, असा हट्ट धरला आहे. एक हजाराच्या जनसमुदायाला यात्रेत सहभागी होण्याची परवानगी दिल्यास करोनाशी संबंधित सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची हमी देवस्थान समितीने देऊ केली आहे. ५० व्यक्तींची मर्यादा एक हजारापर्यंत वाढविल्यास करोनाशी संबंधित नियम व अटींचे पालन कसे होणार, हा मुद्दा आहे. परंतु यात लोकप्रतिनिधींनी स्वत:चा राजकीय स्वार्थ साधण्याच्या उद्देशाने करोना प्रादुर्भाव आणि त्याविषयीची जोखीम दुर्लक्षित करून देवस्थान आणि पुजारी मंडळींच्या बाजूने उडी घेतली आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक, आंध्र-तेलंगणापर्यंत कीर्ती असलेल्या सिद्धेश्वर यात्रेला सुमारे साडेआठशे-नऊशे वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. देवस्थान समितीवर काडादी घराण्याचे वर्चस्व चालत आहे. वीरशैव लिंगायत समाजाचे सांस्कृतिक व धार्मिक बलस्थान म्हणून या देवस्थानाची स्वतंत्र ओळख आहे.

यात्रेवरून आता राजकारण सुरू झाले आहे. देवस्थान समितीची धुरा सांभाळणारे धर्मराज काडादी यांची कोंडी करण्यासाठी प्रत्येक संधी शोधणारे आमदार विजय देशमुख यांनी आता सिद्धेश्वर यात्रेवरील प्रस्तावित निर्बंध दूर होण्यासाठी काडादी यांच्यासह देवस्थान समितीला दूर ठेवून बैठकांचे सत्र आरंभले आहे. त्यासाठी त्यांनी देवस्थानाचे वंश परंपरागत पुजारी हिरेहब्बू कुटुंबीयांसह आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेतले आहे. स्वत:ची राजकीय ताकद कमी पडते म्हणून की काय, त्यांनी करमाळ्याचे अपक्ष आमदार संजय शिंदे यांचीही मदत घेतली आहे. काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी काडादी यांना मदत करण्याची भूमिका घेतली. परस्परांवर कुरघोडय़ा करण्याकरिता सिद्धेश्वर यात्रेचा उपयोग केला जात आहे.

चार हुतात्मे आणि सिद्धेश्वर यात्रा..

सिद्धेश्वर यात्रेला साडेआठ-नऊशे वर्षांची मोठी परंपरा आहे. आतापर्यंत एकदाही ही यात्रा खंडित झाली नाही. अपवाद फक्त १९३१ सालचा होता. १२ जानेवारी १९३१ रोजी यात्रेचा पहिला दिवस होता. परंतु त्याच दिवशी पहाटे सोलापुरातील मार्शल लॉ चळवळीत सहभागी झालेल्या मल्लप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे, अब्दुल रसूल कुर्बान हुसेन आणि श्रीकिशन सारडा या चौघा देशभक्तांना पुण्यातील येरवडा कारागृहात फासावर चढविण्यात आले होते. त्यामुळे सोलापुरात शोककळा पसरली होती. परिणामी, त्यादिवशी सिद्धेश्वर यात्रेतील नंदीध्वजांची मिरवणूक स्थगित करण्यात आली होती.