ग्राहकहिताच्या अनेक समस्यांकडे शासन डोळेझाक करत असल्याचा आरोप करत जनजागृती ग्राहक मंच, रायगड या संघटनेतर्फे येत्या रविवारी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निवासस्थानासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.  शिधावाटप दुकानांवर लक्ष ठेवणाऱ्या गावकऱ्यांच्या दक्षता समितींचे ठप्प कामकाज, नगरपालिका व तालुका दक्षता समित्यांवर अशासकीय सदस्यांच्या नेमणुका न झाल्याने शिधावाटपात होणारे आर्थिक गैरव्यवहार, रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे दोन वर्षांपासूनचे स्थगित कामकाज यामुळे ग्राहकांवर मोठा अन्याय होत असून शासन त्याकडे डोळेझाक करत आहे, असा आरोप या संघटनेचे पनवेल शाखेचे अध्यक्ष पी. जी. सावंत व सचिव बी. पी. म्हात्रे यांनी केला आहे. या पाश्र्वभूमीवर, शासनापर्यंत ग्राहकांचा निषेध पोहोचण्यासाठी रविवार, २४ फेब्रुवारीला सकाळी १० ते चार या कालावधीत आमदार ठाकूर यांच्या निवासस्थानासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.  दक्षता समित्या कार्यरत करणे, जिल्हा ग्राहक मंचावर कायमस्वरूपी सदस्य व अध्यक्ष नेमणे, नियमित सुनावणी घेणे, जिल्हा ग्राहक मंचाचे कार्यालय नवीन वास्तूत स्थलांतरित करणे, भ्रष्टाचार निर्मूलन समित्यांच्या सभा नियमित घेणे आदी मागण्यांसाठी ही संघटना शासनाकडे पाठपुरावा करत आहे.