पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जगद्गुरू संत तुकाराम महाराज मूर्ती, शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा १४ जून रोजी पार पडणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर देहू संस्थान आणि पोलीस विभागामार्फत जय्यत तयारी करण्यात आले आहे. त्याच दरम्यान देहू संस्थानकडून पुण्यातील मुरुडकर झेंडेवाले यांना तुकोबांची पगडी आणि उपरणे तयार करण्यास सांगितले आहे. ही पगडी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना १४ तारखेच्या कार्यक्रमामध्ये भेट देण्यात येणार आहे. या पगडीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगू लागली आहे.

मोदींना पगडी आणि उपरणे भेट

या पगडीबाबत गिरीश मुरुडकर यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, आजवर आमच्यामार्फत अनेक राजकीय, सामाजिक, क्रीडा आणि कला क्षेत्रातील मान्यवर मंडळीकरीता पगडी, फेटे तयार करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ जूला देहू दौऱ्यावर येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर देहू संस्थानकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकरिता पगडी आणि उपरणे तयार करण्यात यावे, असे सांगण्यात आले आहे. त्यानुसार आम्ही मागील तीन चार दिवसापासून पगडी आणि उपरणे तयार करीत आहोत. पुढील काही तासात ते काम पूर्ण होईल. या पगडीचे आणि उपरण याच वैशिष्ट म्हणजे याला वेगळे कापड वापरले गेले आहे. पगडीच्यावरील बाजूस तुळशीची माळ, चिपळी, टाळ आणि पगडीच्या एका बाजूला जगद्गुरू संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांची छोटीशी प्रतिमा लावली आहे.

हेही वाचा – Rajya Sabha Election: गंभीर आजाराने त्रस्त असतानाही लक्ष्मण जगताप करणार मतदान; रुग्णवाहिकेतून मुंबईसाठी रवाना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोन वर्षानंतर सोहळ्याचे आयोजन
येत्या २० जूनपासून संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यास सुरुवात होणार आहे. गेल्या दोन वर्षापासून करोनामुळे हा सोहळा स्थगित करण्यात आला होता. यंदाच्या वर्षी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्यामुळे हा सोहळा उत्साहात पार पडणार आहे. तसेच सोहळ्याअगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी देहूला भेट देणार असल्यामुळे याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.