‘भाषा टिकवण्याची जबाबदारी सरकारवर कशी टाकता? त्यात सरकार काय करणार? अखेर भाषा आणि संस्कृती टिकविणे ही लोकांचीच जबाबदारी असते,’ असे स्पष्टपणे बजावतानाच ज्येष्ठ साहित्यिक आणि नाटककार महेश एलकुंचवार यांनी मराठी मध्यमवर्गाच्या दुटप्पीपणावर नेमके बोट ठेवले. त्याचवेळी हल्लीच्या महाराष्ट्रात मला विचारवंत दिसत नाही, असे सांगून त्यांनी महाराष्ट्राच्या वैचारिक दैन्यावस्थेबद्दलही खंत व्यक्त केली.   
‘लोकसत्ता’च्या ‘आयडिया एक्स्चेंज’ उपक्रमात बोलताना त्यांनी मराठी साहित्य, भाषा, संस्कृती आणि मुख्य म्हणजे मराठी नाटक अशा विविध विषयांवर दिलखुलास आणि तितक्याच थेट परंतु संयतपणे आपली मते मांडली. होळीपासून वाडा चिरेबंदी आणि अगदी अलिकडच्या सोनाटा या नाटकांनी मराठी नाटय़विश्व अधिक गहिरे करणारे एलकुंचवार यांनी यावेळी लेखक आणि समाज यांच्या नातेबंधाचा नकाशाच अत्यंत समंजसपणे उलगडून दाखविला. भाषा आणि संस्कृतीच्या प्रश्नावर मात्र त्यांच्या बोलण्याला एका सात्विक आक्रमकपणाची जोड होती. ते म्हणाले,‘माझा राग मध्यमवर्गावर आहे. मुलांना इंग्रजी शिकवा, पण लोकांना घरात मराठी का बोलता येत नाही? संस्कृती, भाषा टिकवणे ही काय सरकारची जबाबदारी आहे?’ सरकारनेच सगळे काही करावे हा सांस्कृतिक आळशीपणा आपल्याकडे आहे, अशी चपराकही त्यांनी लगावली.  
‘विचारवंत या प्रकाराची मला भीती वाटते. व्यावसायिक यश मिळाले की त्या कलावंताचे मत छापले जाते. असे दहा वेळा छापून आल्यावर तोविचारवंत होतो,’ असे निरीक्षण नोंदवून ते म्हणाले,‘हल्ली मला महाराष्ट्रात विचारवंत दिसतच नाहीत. ज्यांची राजकीय आणि सामाजिक भूमिका निश्चित आहे अशा लेखकाने मूलभूत स्वरूपाचा विचार द्यायचा असेल तरच मत व्यक्त करावे. सगळ्या कलावंतांना अशी भूमिका घेता येत नाही.’
आपल्या नाटकांनी मराठीच नव्हे, तर जागतिक रंगभूमीवर आपली नाममुद्रा कोरणाऱ्या या नाटय-अवलियाने या वेळी आपली नाटय़निर्मितीची प्रक्रियाही उलगडून दाखविली. ‘नाटक हा पोहोण्यासारखा वैयक्तिक अनुभव नसतो, तर ती क्रिकेटसारखी समूहकला असते. एकच नाटक वेगवेगळ्या पद्धतीने रंगमंचावर सादर होते. त्यामुळे त्याचा अनुभव हा एकार्थ राहत नाही.’ थोरपणाचा कोणताही भाव आणि आव न आणता हे समजावून सांगत असतानाच, ‘माझ्याच नाटकाचे प्रयोग पाहण्याचे धैर्य मी करत नाही. कारण प्रयोग पाहताना लेखनातील त्रुटी जाणवतात,’ असेही वऱ्हाडी मनमोकळेपणे सांगून सध्याच्या आपल्या ‘साध्यासुध्या’ जगण्यावर ते बोलत राहिले. त्यातून जे समोर येत होते, ते मात्र तितकेसे साधेसुधे नव्हते..