त्रिपुरात मुस्लीम समाजावर होणाऱ्या कथित अत्याचारांच्या निषेधार्थ आयोजित मोर्चाला राज्यात काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. परिस्थिती नियंत्रणात असून पोलीस प्रशासनाने दक्ष राहावे, असे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलिस महासंचालकांना दिले आहेत.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर राज्यातील जनतेला शांतता व संयम राखण्याचे आवाहन केले आहे. राज्य सरकार पूर्णपणे परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहे. तसेच गृहमंत्री स्वतः वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमार्फत परिस्थितीवर देखरेख ठेवून आहेत. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. संयम बाळगावा असे सर्व हिंदू व मुस्लीम बांधवांना कळकळीचे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.

यामध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले असून या परिस्थितीत आपण सगळ्यांनी सामाजिक ऐक्य राखणे आवश्यक आहे आणि त्या दृष्टीकोनातून सगळ्यांनी सहकार्य करावे, अशी विनंती त्यांनी जनतेला केली आहे. गृहमंत्र्यांनी पोलिस बांधवांनाही परिस्थिती संयमाने हाताळण्याचे आणि राज्यामध्ये शांतता कशी राहील यादृष्टीने कार्य करण्याचे आवाहन केले आहे.