किडनी तस्करी प्रकरणी एका किडनी पीडिताच्या पत्नीच्या जागी दुसरीच महिला दाखवून तिचे बनावट मतदार पत्र तयार करण्यात आल्याची माहिती तपासात समोर आली. असे बनावट मतदार पत्र बनविणाऱ्याला स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांच्या पथकाने मंगळवारी अटक केली. त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
या प्रकरणी दोघांची सवरेपचार रुग्णालयात आरोग्य तपासणी करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
या प्रकरणातील आरोपी देवेंद्र शिरसाट याची पोलीस कोठडीत चौकशी करण्यात येत असून, तो ३० डिसेंबपर्यंत पोलीस कोठडीत आहे. मुख्य सूत्रधार शिवाजी कोळी, आनंद जाधव व विनोद पवार हे तिघेही कारागृहातच आहेत. या प्रकरणी मोठय़ा प्रमाणात बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली. आरोपी देवेंद्र शिरसाटने किडनीदाता संतोष कोल्हटकर यांच्या पत्नीच्या जागेवर दुसरीच महिला उभी केली होती. त्यासाठी त्या महिलेला ५०० रुपये मोबदला देण्यात आला. किडनी प्रत्यारोपणासाठी आवश्यक असलेले या महिलेचे खोटे मतदार पत्र तयार करण्यात आले होते. पोलीस तपासात हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणानी खदान येथील एका फोटो स्टुडिओत ते तयार करण्यात आल्याचे समजल्यावर या स्टुडिओचा चालक प्रशिस ज्ञानेश्वर वानखडे (२७, रा.धोबीखदान) याला डाबकी रोड पोलिसांनी अटक केली होती. किडनी तस्करीच्या प्रकरणात अनेक मोठय़ा डॉक्टरांचा समावेश असल्याची माहिती आहे.