सोलापूर : मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदरसारख्या साखर पट्ट्यात स्मशानभूमीमध्ये जादूटोणा, करणी, भानामतीच्या नावाखाली अघोरी प्रकार उजेडात आला असून याप्रकरणी एका महिलेसह दोघाजणांविरुद्ध जादूटोणा प्रतिबंधक कायद्याखाली मोहोळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मनीषा बबन खांडेकर आणि ज्ञानेश्वर लोंढे (दोघे रा. टाकळी सिकंदर) अशी या गुन्ह्यातील आरोपींची नावे आहेत. या घटनेमुळे टाकळी सिंकदर गावासह आसपासच्या भीमा नदीकाठच्या गावांमध्ये भोळ्या भाबड्या ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
यासंदर्भात याच गावात राहणाऱ्या सीमा सिद्धेश्वर परबतराव (वय ४०) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार काही दिवसांपूर्वी सीमा यांच्या मुलाने दारूच्या नशेत मनीषा खांडेकर हिला शिवीगाळ केली होती. त्यातून त्यांच्यात भांडण झाले होते. त्यावेळी मनीषा खांडेकर हिने सीमा यांच्या मुलाला शिव्याशाप दिला होता. योगायोगाने पुढे थोड्याच दिवसांत दारूच्या नशेत सीमा यांच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेमुळे सीमा परबतराव यांना मनीषा खांडेकर ही जादूटोणा करीत असल्याचा संशय आला. त्यांनी तिला जाब विचारत, तू जादूटोणा आणि करणी, भानामती करतेस. त्यामुळेच माझ्या मुलाचा जीव गेला, असा आरोप करून वाद घातला होता. त्यातून त्यांच्यात पुन्हा भांडण झाले होते. याच पार्श्वभूमीवर मनीषा खांडेकर आणि तिचा साथीदार ज्ञानेश्वर लोंढे हे दोघे सीमा परबतराव यांच्यासह वैर असलेल्या अन्य ग्रामस्थांची छायाचित्रे गोळा करून गावातील स्मशानभूमीत नेली आणि त्या सर्व छायाचित्रावर, सर्व संबंधितांचा व्यवसाय बुडावा, त्यांचे आर्थिक नुकसान व्हावे अशा आशयाचा मजकूर लिहून सर्व छायाचित्रे जाळली आणि राख एका टोपलीमध्ये भरून त्यात मांस, लिंबू, काळा दोरा आदी जादूटोणा करण्याचे साहित्य ठेवून अनिष्ठ, जादूटोणा, करणी-धरणीसारखे अघोरी कृत्य केले.
हेही वाचा – सांगली : कसाबच्या नावाने बॉम्बस्फोटाची धमकी देणाऱ्याला अटक
हेही वाचा – सोलापूर: गोवा पर्यटन करून परतणाऱ्या दाम्पत्याची सांगोल्याजवळ वाटमारी
गावकऱ्यांनीच हा प्रकार उजेडात आणला. याप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात मनीषा खांडेकर व तिच्या साथीदाराविरुद्ध महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियमाखाली फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे.