लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सध्या सुरू आहे. सर्वज राजकीय पक्षांच्या नेत्यांनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या दोन वर्षात अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. त्याबाबत अनेक नेते गौप्यस्फोट करत आहेत. आता शरद पवार यांनी लोकसत्ता लोकसंवादमध्ये बोलताना २०१९ साली शिवसेनेच्या अंतर्गत झालेल्या बैठकीत एकनाथ शिंदे यांचं नाव चर्चेत होतं. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला मुख्यमंत्रीपदासाठी एकमताने सहमती दर्शवण्यात आली, असं विधान केलं होतं.
त्यानंतर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार बनवण्यासाठी चर्चा सुरू होत्या, त्यावेळी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री नको म्हणून सुनील तटकरे आणि अजित पवार यांनी विरोध केला होता. त्याआधी शिवसेना-भाजपामध्ये मुख्यमंत्री पदावरून वाद सुरु होता, तेव्हाही भाजपाने एकनाथ शिंदे यांच्या नावाला विरोध केला होता, असं विधान संजय राऊत यांनी केलं. संजय राऊत यांच्या या विधानावर शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया देत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
संजय शिरसाट काय म्हणाले?
“एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी भाजपाचा आणि राष्ट्रवादीचा विरोध होता, असा ठाकरे गटाने केलेला आरोप हा खोटा आहे. कारण आम्ही अनेक आमदार तेव्हा त्या ठिकाणी उपस्थित होतो. २०१४ ला सरकार आलं तेव्हा भाजपाने उपमुख्यमंत्री पद घेण्याची ऑफर दिली होती. त्यावेळी उपमुख्यमंत्री पद कोणाला द्यायचं तर तेव्हा एकनाथ शिंदे यांचं नाव चर्चेत होतं. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या नावाला उद्धव ठाकरे यांनी विरोध करत ते पद स्वीकारलं नाही. त्यामुळे २०१४ ला पाच वर्ष उपमुख्यमंत्रीपद तसंच राहिलं”, असं संजय शिरसाट म्हणाले.
“२०१९ साली निवडणुका झाल्यानंतर सर्वांची बैठक झाली. मात्र, तेव्हा बैठकीत ऐनवेळी एक मुद्दा उपस्थित करण्यात आला. तो मुद्दा म्हणजे आपल्याला (शिवसेनेला) मुख्यमंत्रीपद पाहिजे. जर भाजपावाले मुख्यमंत्रीपद देत नसतील तर आपल्याला इतर पक्षांबरोबर जायला मार्ग मोकळा आहे, अशा शब्दात तेव्हा ठाकरे गटाच्या नेत्यांनी सांगितलं होतं. देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या अनेक नेत्यांनी मातोश्रींवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी त्यांचे फोन घेतले गेले नाही. तेव्हा सर्व आमदारांना सांगण्यात आलं की आपण इतर पक्षांबरोबर जात असून शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवत आहोत. तेव्हा आमची भावना होती की, एकनाथ शिंदे यांच्याशिवाय दुसरं कोणी नसेल. मात्र, एक डाव रचला गेला आणि शरद पवार यांच्याकडे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करा, असा आग्रह ठाकरे गटाच्या नेत्यांनी केला”, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.
संजय शिरसाट पुढे म्हणाले, “मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांना भाजपाचा कोणताही विरोध नव्हता. मात्र, त्यावेळी शिवसेनेला पाच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद देतो, अशी गुगली शरद पवार यांनी टाकली. त्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी ठाकरे गटाने तो निर्णय घेतला. अन्यथा त्यावेळी रात्री साडेसात वाजेपर्यंत फोन येत होते. एकनाथ शिंदेंही बोलले होते की, ते मुख्यमंत्री पद द्यायला तयार आहेत. पण तेव्हा तुला जायचे असेल तर जा, असं उद्धव ठाकरे बोलले होते”, असं संजय शिरसाट म्हणाले.