एका उच्चशिक्षित भावी वराने वधूकडील मंडळींकडून विचित्र प्रकारच्या अटी व शर्तीना संमती असल्याचे स्टॅम्प पेपरवर लिहून मागितले. अशा वर पक्षातील मंडळींविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. रामेश्वर कॉलनीत प्रल्हाद पाटील हे राहतात. संगणक अभियंता असलेल्या त्यांच्या मुलाच्या विवाहासाठी धुळ्याची मुलगी पाहण्यात आली. वर्षभरापूर्वी त्यांचा साखरपुडा व लग्नाची तारीख निश्चित झाली होती. त्यानुसार वर रवींद्रसह इतर मंडळी धुळे येथे साखरपुडय़ासाठी गेली. देवपूर भागात साखरपुडय़ाची तयारी सुरू होताच वर रवींद्रने वधूपित्याकडे एक स्टॅम्प पेपर दिला. त्यावर ‘आमची मुलगी कमी शिकलेली आहे. लग्नानंतर तिचे, तिच्या पतीचे किंवा सासरकडील मंडळींचे काही बरेवाईट झाले तर, त्याला सर्वस्वी मुलगी व आई-वडीलच जबाबदार राहू,’ असे लिहिलेले होते. या पेपरवर रवींद्रला वधूपित्याची स्वाक्षरी हवी होती. पेपरवर स्वाक्षरी करा तरच साखरपुडा व लग्न करतो. अन्यथा जळगावला परत जातो, अशी धमकीच त्याने दिली. वरासह त्यांच्याकडील मंडळींना समजाविण्याचा प्रयत्न असफल ठरले. मागणी धुडकावल्याने वराकडील मंडळी जळगावी परतली.