५२४ मतदान केंद्रांवर यंत्रणा सज्ज

पंढरपूर : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उद्या (१७ एप्रिल) मतदान होत असून यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली.

या पोटनिवडणुकीसाठी ३ लाख ४० हजार ८८९ मतदार असून ते ५२४ मतदान केंद्रांवर मतदान करू शकतील. निवडणुकीसाठी २५५२ अधिकारी-कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच कर्मचारी व मतदान साहित्य वाहतुकीसाठी ९४ एसटी बस व तीन जीपची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती गुरव यांनी दिली.

मतदार संघातील सर्व मतदान केंद्रांवर स्वच्छ पिण्याचे पाणी, पुरेसा वीजपुरवठा, शौचालय, दिव्यांगासाठी रॅपची सुविधा करण्यात आली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक होत असल्याने मतदान केंद्रावर करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. मतदान केंद्रावर स्वच्छ हात धुण्यासाठी साबण, सॅनिटायझर, मुखपट्टी आदी साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर आरोग्य पथकाची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती गुरव यांनी दिली.