शहरातील ‘परिवर्त जनता’ या अक्षर चळवळीच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर दिनाच्या निमित्ताने नाशिक रोड येथे सोमवारी ‘प्रबोधन उत्सव’चे आयोजन करण्यात आले आहे.
नोट प्रेसजवळील यू. एस. जिमखाना सभागृहात सायंकाळी पाच वाजता हा उत्सव होणार आहे. कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या भूमिहीनांचा सत्याग्रह आणि नामांतर आंदोलनात विशेष सहभाग असलेल्या आणि परिवर्तनाच्या चळवळीत विशेष योगदान दिलेल्या महिलांचा गौरव करण्यात येणार आहे. त्यात नाजाबाई सोनवणे, गौतमाबाई कांबळे, बकुबाई बर्वे, उमाबेन मारू, शांताबाई बोढारे यांचा समावेश आहे. औरंगाबाद येथील प्रसिद्ध लेखक व विचारवंत डॉ. प्रल्हाद लुलेकर यांचे ‘सर्वासाठी बाबासाहेब’ या विषयावर व्याख्यान व प्रसिद्ध शाहीर संभाजी भगत आणि संचाचा क्रांतिकारी गीतांचा ‘आंबेडकरी जलसा’ या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आलेले आहे. या वेळी परिवर्त त्रमासिकाच्या विशेष अंकाचे प्रकाशन नागपूरचे सुधीर भगत, माजी महापौर अशोक दिवे आणि नाशिक विभागाचे सहनिबंधक गौतम भालेराव यांच्या हस्ते होणार आहे. या उत्सवाचे संयोजन परिवर्त त्रमासिकाचे संपादक प्रा. गंगाधर अहिरे तसेच कामुराज बोढारे, करुणासागर पगारे, कामगारांचे नेते रामभाऊ जगताप आणि प्रकाश पगारे यांनी केले आहे. या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन अशोक मोरे, रोहित गांगुर्डे, श्यामराव बागूल, जयंत बोढारे आदींनी पत्रकाद्वारे केले आहे.