कळमनुरी तालुक्यातील करवाडी हे धड रस्ताही नाही आणि धड आरोग्य सुविधाही नसलेले गाव. या गावातील ग्रामस्थांवर रविवारी एक अवघड प्रसंग ओढवला. एका महिलेला अचानक प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या. तिला शहरातील गावात कसे न्यायचे, असा प्रश्न ग्रामस्थांसमोर उभा राहिला. तिच्या वेदना तर क्षणाक्षणाला वाढत होत्या. रस्ता नसल्यामुळे वाहन येण्याचे किंवा नेण्याची सोयच नाही. कशी-बशी रुग्णवाहिका आली पण तिही गावापासून तीन किमी अंतरावर थांबली. तेथपर्यंत पोहोचण्यासाठी अखेर चार ग्रामस्थांना त्या गर्भवती महिलेला खाटेवर झोपवून तीन किमीची पायपीट करीतच न्यावे लागले.
कळमनुरी तालुक्यातील नांदापूर ग्रामपंचायत अंतर्गत करवाडी एक छोटेसे गाव. या गावात चारशे लोकांची वस्ती. हे गाव आदिवासी बहुल. बहुसंख्य गावकऱ्यांचा उदरनिर्वाह शेती व्यवसायावर. डिजिटल इंडिया, बुलेट ट्रेन, वायफायसारख्या तंत्रज्ञानाची गरज, अशा आजच्या परवलीच्या शब्दांपासूनही गाव तसे दूरच. गावात आजही धड रस्ता नाही. पावसाळ्यात चिखलाची मळलेली वाटच तुडवत जावे-यावे लागते. इतकी दळणवळणाची वाईट अवस्था आहे. अशा करवाडी गावातील एका महिलेस प्रसूती वेदना होत असताना तिच्या नातेवाइकांनी रुग्णसेविकेसाठी दूरध्वनी केला. परंतु गावात जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे रुग्णवाहिका गावापासून तीन किलोमीटर अंतरावर उभी राहिली. या महिलेस असह्य वेदना होत असल्याने गावकऱ्यांनी एका खाटेवर तिला झोपवून तीन किलोमीटर अंतरावर पायपीट करून महिलेस रुग्णवाहिकेपर्यंत आणले. त्यानंतर महिलेस पोत्रा येथे नेण्यात आले. मात्र, ती अस्वस्थ झाल्याने परिस्थितीचे गांर्भीय लक्षात घेऊन त्या महिलेस हिंगोलीच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. गावातील नागरी सुविधांकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष आहे. गावकऱ्यांनी रस्त्याच्या मागणीसाठी वारंवार शासनाकडे मागणी केली. त्यांचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलने केली. मात्र, त्याची दखल अद्यापतरी शासनाने घेतली नाही.
रस्त्यासाठी आंदोलने केली पण..
पावसाळ्यापूर्वीच ग्रामस्थांना संसार-उपयोगी वस्तू आधीच खरेदी कराव्या लागतात. गावातील नागरी सुविधाकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष आहे. गावकऱ्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलने केली, रस्त्याची मागणी केली, परंतु काही उपयोग नाही. परिणामी गर्भवती महिलेला खाटेवरून रुग्णवाहिकेपर्यंत नेण्यासाठी तीन किमीची पायपीट करावी लागली.