आपल्याच आश्रमशाळेतील महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेले माजी आमदार लक्ष्मण माने यांना वाचवण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यां अ‍ॅड. वर्षां देशपांडे आपल्यावर दबाव आणत असल्याचा आरोप अत्याचारग्रस्त महिलांचे वकील अ‍ॅड. राजेंद्र गलांडे यांनी बुधवारी केला. ‘माझ्या भावाविरुद्धही कुणा महिलेची तक्रार आली तर मी त्याला सोडणार नाही’ असे सांगणाऱ्या वर्षां देशपांडे यांची या प्रकरणातील भूमिका धक्कादायक असल्याची टीकाही त्यांनी केली.
लक्ष्मण माने कार्याध्यक्ष असलेल्या भटके विमुक्त विकास व संशोधन संस्थेतील अत्याचारग्रस्त महिला कर्मचारी माझ्या अशील आहेत. मात्र, हे प्रकरण मिटवण्यासाठी काही कार्यकर्त्यांमार्फत आपल्यावर दबाव टाकला जात असल्याचा आरोप अ‍ॅड. गलांडे यांनी एका पत्रकाद्वारे केला. स्वत:ला सामाजिक कार्यकर्त्यां म्हणवणाऱ्या व्यक्तींचे मला रात्री-अपरात्री दूरध्वनी येतात. फिर्यादी महिला तुझ्या ओळखीच्या आहेत. तू ताबडतोब पोलीस स्टेशनला ये, आपण हे प्रकरण मिटवून टाकू, असे आपल्याला धमकावण्यात येत असल्याचेही गलांडे यांनी म्हटले. वर्षां देशपांडे यांच्याशी माझा कोणताही वाद नाही, पण त्यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल होऊ नये यासाठी केलेली धडपड पाहून त्यांचेही पाय मातीचेच असल्याचे दिसून आले, अशी टीकाही त्यांनी केली.
दरम्यान, विद्या बाळ, अ‍ॅड. पल्लवी रेणके, हरी नरके आदींनी पीडित महिलांची बुधवारी भेट घेतली. पीडित महिलांना न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी विद्या बाळ यांनी केली. त्याचबरोबर या प्रकरणी काही महिला संघटनांनी विशेषत: वर्षां देशपांडे यांनी घेतलेली भूमिका खूपच धक्कादायक असल्याचेही त्या म्हणाल्या.