शिक्षणाच्या माध्यमातून राष्ट्रउभारणीचे कार्य प्राचार्य वर्गाकडून केले जात आहे. समाज, सरकार, व्यवस्थापन व विद्यार्थी यांना जोडणारा प्राचार्य हा सक्षम दुवा आहे. उच्च शिक्षणात गुणवत्ता निर्माण करण्यासाठी दूरदृष्टी असलेल्या ध्येयवादी प्राचार्याची समाजाला गरज आहे, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी केले.
श्री शिवाजी महाविद्यालयात आयोजित प्राचार्य महासंघाच्या ३४व्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे उद्घाटन करताना डॉ. विद्यासगर बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालय स्थानिक नियामक मंडळाचे प्रमुख हेमंतराव जामकर उपस्थित होते. मराठवाडा शिक्षण मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे, राज्य प्राचार्य महासंघाचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार निकम, सरचिटणीस डॉ. एस. बी. लोहिया, सहचिटणीस डॉ. डी. आर. मोरे, कोषाध्यक्ष डॉ. एस. व्ही. बिराजदार, विद्यापीठ प्राचार्य कल्याण संघाचे अध्यक्ष तथा अधिवेशनाचे संयोजक डॉ. बाळासाहेब जाधव, डॉ. क्रांतीकुमार पाटील आदी उपस्थित होते.
डॉ. विद्यासागर यांनी प्राचार्याकडून असलेल्या अपेक्षा व प्राचार्यासमोरील आव्हाने याविषयी विस्ताराने मार्गदर्शन केले. महिला दिनाचे औचित्य साधून महिलांचे हक्क व संरक्षणाची अपेक्षा व्यक्त केली. प्राचार्यानी पारदर्शक कारभार करुन सहकाऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे, असेही ते म्हणाले. संशोधनात्मक लेखांची स्मरणिका या वेळी प्रकाशित करण्यात आली. त्यांचे संपादन प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव, डॉ. रोहिदास नितोंडे व प्रबंधक विजय मोरे यांनी केले. महासंघाचे राज्य सरचिटणीस डॉ. एस. बी. लोहिया यांनी अहवालवाचन केले. प्रा. रविशंकर िझगरे यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य डॉ. सर्जेराव िशदे यांनी आभार मानले.