लोकसेवा प्रतिष्ठानतर्फे विविध उपक्रम
संरक्षण, अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षणामध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीने लक्ष्य, पायोनिअर, आई असे विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, आयआयटी, एनआयटी यांसारख्या संस्थांमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची संख्या वाढावी यासाठी लोकसेवा प्रतिष्ठान, युक्ती एज्युकेशनल सव्‍‌र्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड व निवृत्त एअर कमांडर प्रकाश देवी यांच्या वतीने प्रकल्पांची आखणी करण्यात आली आहे. लोकसेवा प्रतिष्ठानच्या फुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस मुलांच्या सैनिकी शाळेत हे उपक्रम राबवले जाणार आहेत. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या प्रवेश परीक्षेची तयारी करण्यासाठी लक्ष्य, अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी पायोनिअर आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी फक्त मुलींकरिता आई हे प्रकल्प राबवण्यात येणार आहेत. लक्ष्य आणि पायोनिअर प्रकल्पासाठी दहावीला ८० टक्क्य़ांपेक्षा जास्त गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना थेट प्रवेश देण्यात येणार आहे, तर त्यापेक्षा कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना मुलाखतीच्या माध्यमातून प्रवेश देण्यात येणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक पायगुडे यांनी दिली आहे.
आई या प्रकल्पासाठी ८५ टक्क्य़ांपेक्षा अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थिनींना थेट प्रवेश देण्यात येणार आहे, तर त्यापेक्षा कमी गुण मिळालेल्या विद्यार्थिनींना प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून प्रवेश देण्यात येणार आहे. ९० टक्क्य़ांपेक्षा अधिक गुण असलेल्या विद्यार्थिनींसाठी शंभर टक्के शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. याशिवाय विद्यार्थी दत्तक योजनाही राबवण्यात येणार असून ९० टक्के किंवा अधिक गुण मिळवलेल्या परंतु आर्थिकदृष्टय़ा अक्षम असलेल्या ७५ विद्यार्थ्यांना दत्तक घेतले जाणार आहे.
या शिष्यवृत्तीबाबत अधिक माहितीसाठी ९७६३४५८६३४ किंवा ९८६०९५०१६४ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन पायगुडे यांनी केले आहे.