राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणा-या माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपले वारसदार म्हणून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांची  उमेदवारी पुढे आणली असून त्यांच्या प्रचाराचा नारळही पवार यांनीच फोडला आहे. तर राष्ट्रवादीच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ पंढरपुरात विठ्ठल मंदिराच्या नामदेव पायरीवर नारळ वाढवून केला आहे. ही निवडणूक दोन्ही पक्षांना सोपी नाही तर निवडून येण्यासाठी दोन्ही प्रमुख उमेदवारांना ताकद पणाला लावावी लागणार असल्याचे चित्र दिसून येते.
मागील २००९च्या लोकसभा निवडणुकीत स्वत: शरद पवार हे माढय़ाच्या रणांगणात उतरून सुमारे सव्वातीन लाखांच्या मताधिक्याने निवडून गेले होते. राष्ट्रवादीसाठी सुरक्षित मतदारसंघ म्हणून माढय़ाची गणना केली जात असली तरी गेल्या साडेचार-पाच वर्षांत या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध राहिला नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला गट बळकट करण्यासाठी पक्षात दुस-या फळीतील मंडळींना ताकद दिल्यामुळे विजयसिंह मोहिते-पाटील यांचा गट पक्षात अस्तित्वहीन ठरला होता. या पाश्र्वभूमीवर होणा-या लोकसभा निवडणुकीत उमेदवार ठरवताना राष्ट्रवादीत तिढा निर्माण झाला होता. अखेर शरद पवार यांनी मोहिते-पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करून ही जागा कायम राखण्याचा चंग बांधला आहे.
पक्षाची उमेदवारी मिळाल्यानंतर मोहिते-पाटील यांच्या प्रचाराचा नारळ सांगोला येथे शरद पवार यांनी फोडल्यानंतर पक्षातील सर्व स्थानिक नेत्यांना एकत्र बोलावून कानमंत्र दिला. तर मोहिते-पाटील यांनीदेखील मागील पाच वर्षांत पक्षांतर्गत हेवेदावे बाजूला ठेवून पक्षातील विरोधकांशी दिलजमाई करण्यावर भर दिला आहे. त्याची सुरुवातच अकलूजजवळील सराटी (ता. इंदापूर) येथील एका जाहीर सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर केलेल्या समझोत्याने झाली असून त्यानंतर विजयसिंह मोहिते-पाटील व त्यांचे चिरंजीव माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी पक्षातील आपले विरोधक समजले जाणारे माढय़ाचे आमदार बबनराव शिंदे, पंढरपूरचे माजी आमदार सुधाकर परिचारक, करमाळय़ाच्या आमदार श्यामल बागल, विधान परिषद सदस्य दीपक साळुंखे आदींना प्रत्यक्ष भेटून मनोमिलनाचा सूर आळवला आहे.
शरद पवार यांनी प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर मोहिते-पाटील यांच्या प्रचाराला प्रारंभ होत असताना दुसरीकडे त्यांचे प्रतिस्पर्धी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी आपल्या प्रचाराचा नारळ पंढरपुरात विठ्ठल मंदिराच्या नामदेव पायरीवर फोडला आहे. या वेळी खोत यांनी आपली लढत राष्ट्रवादीचे विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याबरोबर नाही तर त्यांचे बंधू प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्याशी राहणार असल्याचा दावा केला.