लोकसभा निवडणुकीत सोलापूर राखीव व माढा या दोन्ही मतदारसंघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून धडाडणाऱ्या प्रचाराच्या तोफा मंगळवारी सायंकाळी शांत झाल्या. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी व महायुतीच्या प्रमुख तुल्यबळ उमेदवारांनी आपल्या समर्थकांसह पदयात्रांसह सभा, बैठका घेऊन मतदारांना शेवटपर्यंत आकृष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. या प्रमुख लढतीतील उमेदवारांसह त्यांच्या तुलनेत कमी ताकदीच्या इतर उमेदवारांनीही विजयाचे दावे केले आहेत. सायंकाळी प्रचार थांबला तसे तापलेले राजकीय वातावरणही शांत झाले. त्यापाठोपाठ वाढलेला उष्मा अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे काहीसा कमी झाला.
सोलापूर मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार तथा केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात भाजपचे अ‍ॅड. शरद बनसोडे यांनी आव्हान दिले आहे, तर माढय़ात राष्ट्रवादीचे विजयसिंह मोहिते-पाटील, स्वाभिमानी पक्षाचे सदाशिव खोत व अपक्ष प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्यात तिरंगी लढत होत आहे. सोलापुरात आम आदमी पार्टीचे ललित बाबर व बसपाचे अ‍ॅड. संजीव सदाफुले यांच्यासह इतर १२ उमेदवार रिंगणात आहेत. तर माढा येथे आम आदमी पार्टीच्या अ‍ॅड. सविता शिंदे व बसपाचे कुंदन बनसोडे यांच्यासह अन्य १९ उमेदवारांची गर्दी आहे. प्रचारात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना एकमेकास दिली गेलेली आव्हाने व विजयाचे परस्परविरोधी दावे यामुळे ही निवडणूक चर्चेत राहिली. उन्हाची तीव्रता व वाढलेल्या तापमानामुळे हैराण झालेल्या उमदेवारांनी मतदारांशी शेवटपर्यंत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.
सोलापुरात काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांची पदयात्रा सकाळी तुळजापूर वेशीतील बलिदान चौकापासून निघाली असता त्यात हजारोंचा जनसमुदाय सहभागी झाला होता. यात मोहोळचे आमदार प्रा. लक्ष्मण ढोबळे, माजी आमदार राजन पाटील, पंढरपूर-मंगळवेढय़ाचे आमदार भारत भालके, आमदार प्रणिती शिंदे, आमदार दिलीप माने यांच्यासह महापौर अलका राठोड, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष धर्मा भोसले, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष महेश गादेकर आदींचा प्रामुख्याने सहभाग होता. ठिकठिकाणी नागरिक, व्यापारी व शिंदेप्रेमींनी या पदयात्रेचे स्वागत केले. या पदयात्रेद्वारे शक्तिप्रदर्शन पाहावयास मिळाले. काँग्रेस भवनात पोहोचल्यानंतर पदयात्रेची सांगता झाली. त्यानंतर त्याच ठिकाणी धनगर समाजाची बैठक घेऊन शिंदे यांनी मार्गदर्शन केले.
भाजपचे उमेदवार शरद बनसोडे यांनी एकच प्रमुख पदयात्रा काढण्याचे टाळून विविध भागात १५ ठिकाणी पदयात्रा काढल्या. स्वत: बनसोडे यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यात जाऊन विविध गावांना भेटी दिल्या व मतदारांशी संपर्क साधला. शक्तिप्रदर्शनाचा विचार करता काँग्रेसच्या तुलतेत महायुतीची शक्ती कमी पडल्याचे चित्र पाहावयास मिळाले. अक्कलकोटमध्ये भाजपचे आमदार सिद्रामप्पा पाटील यांनी काढलेल्या पदयात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला. तर सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात भाजपचे शहराध्यक्ष, आमदार विजय देशमुख यांनी पदयात्रा काढली असता त्यातही कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती.
आम आदमी पार्टीचे उमेदवार ललित बाबर यांची पदयात्रा विविध भागातून काढण्यात आली असता त्यात माकपचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर हे आपल्या शेकडो समर्थकांसह सहभागी झाले होते.  तर बसपाचे अ‍ॅड. संजीव सदाफुले यांची पदयात्रा पार्क चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून निघाली. यातही शेकडो कार्यकर्ते घोषणा देत उत्साह वाढवित होते.
माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या समर्थनार्थ अकलूज व माळशिरस येथे भव्य पदयात्रा काढण्यात आल्या. अपक्ष प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनीही अकलूजमध्ये पदयात्रा काढली. तर महायुतीचे सदाशिव खोत यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही पदयात्रांपेक्षा गावभेटींवरच भर दिला. राष्ट्रवादीच्यावतीने संपूर्ण मतदारसंघात विधानसभानिहाय पदयात्रा काढण्यात आल्या. करमाळ्यात आमदार श्यामल बागल व माजी आमदार जयवंत जगताप, माढय़ात आमदार बबनराव शिंदे, माजी आमदार धनाजी साठे व विनायकराव पाटील यांनी काढलेल्या पदयात्रांना प्रतिसाद मिळाला. पंढरपुरातील ग्रामीण भागात आमदार भारत भालके व माजी आमदार सुधाकर परिचारक यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा निघाल्या होत्या.