नगर अर्बन बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी सहकार व जनसेवा या दोन्ही मंडळांनी धूमधडाक्यात प्रचाराला सुरुवात केली आहे. गाठीभेटी, प्रचारफे-या व मेळाव्यांवर भर दिला जात आहे. दोन्ही पॅनेलने आपल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या आहेत. प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात सहकार पॅनेलने शाखांवर लक्ष केंद्रित केले आहे, तर जनसेवा पॅनेलने नगर शहरावर भर दिला आहे. प्रचाराने जिल्हय़ातील व्यापारी पेठा ढवळून निघाल्या आहेत.
उमेदवारांच्या ब-याच ओढाताणीनंतर दोन्ही पॅनेलने आपले उमेदवार अखेर जाहीर केले आहेत. दोघा पॅनेलप्रमुखांनी नव्या-जुन्या संचालकांशी समन्वय साधत काही नव्या चेह-यांना संधी देण्याचा प्रयत्न केला आहे. जातीय समीकरणे साधण्याचाही प्रयत्न करण्यात आला आहे. प्रचारपत्रकेही छापण्यात आली आहेत. दोन्ही पॅनेल जाहीरनामे प्रसिद्ध करणार आहेत. रमेश भळगट, अशोक गुगळे, अशोक बोरा, अमृत गट्टाणी, सुरेश बाफना असे अनेक वर्षांपासूनचे आजी-माजी संचालक यंदाच्या निवडणुकीत नाहीत. संचालक नवनीत बोरा यांची उमेदवारी कायम राहिली आहे, मात्र ते दोन्ही पॅनेलचे उमेदवार नाहीत.
जनसेवा मंडळात ७ विद्यमान संचालक, २ माजी संचालक व ९ नवे चेहरे आहेत. वसंत लोढा व त्यांच्या पत्नी लता लोढा या दोघांनाही उमेदवारी मिळाली आहे. पॅनेलचे उमेदवार असे- अतुल भंडारी, राजेंद्र गांधी, प्रकाश कराळे, पारस कोठारी, वसंत लोढा, शिवाजी लोंढे, सतीश लोटके, प्रमोद मोहळे, जवाहर मुथा, बद्रिनारायण राठी, लता लोढा, दीप चव्हाण, सुभाष भंडारी, संजय छल्लारे, संदेश गांधी, राजेंद्र पिपाडा, सीमा दीपक दुगड व संजय जैन. पॅनेलचे नेतृत्व अभय आगरकर, अशोक कोठारी व सुभाष भंडारी करत आहेत. मात्र आगरकर, कोठारी यंदा उमेदवार नाहीत. पॅनेलने उमेदवारी देताना सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग केला आहे.
सहकार पॅनेलने ९ विद्यमान संचालक, २ माजी संचालक व ७ नव्या चेह-यांना यंदा संधी दिली आहे. खा. दिलीप गांधी व ज्येष्ठ नेते सुवालाल गुंदेचा पॅनेलचे नेतृत्व करत आहेत. उमेदवार असे-दिलीप गांधी, सुवालाल गुंदेचा, दीपक गांधी, शैलेश मुनोत, अनिल कोठारी, संजय लुणिया, किशोर बोरा, केदार केसकर, राजेंद्र अग्रवाल, अजय बोरा, साधना भंडारी, मनेष साठे, विजय मंडलेचा, नवनीत सूरपुरिया, अशोक कटारिया, राधावल्लभ कासट, मीना राठी व दिनेश कटारिया. उमेदवारीत जैन समाजाचे प्राबल्य आहे.