संभाव्य गोंधळ रोखण्यासाठी शासकीय आणि पोलीस यंत्रणा सज्ज
नालासोपारा मतदारसंघातील सर्वाधिक बोगस मतदार असल्याचा आरोप करणाऱ्या बहुजन विकास आघाडीने १९ हजारांहून अधिक बोगस मतदारांचे पुरावे जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केले आहे. बोगस मतदारांची तक्रार करूनही कारवाई होत नसल्याने बविआने पक्षाच्या कार्यकर्त्यांनाच बोगस मतदार रोखण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी संभाव्य गोंधळ लक्षात घेता पोलीस प्रशासनही सज्ज झाले आहे.
पालघर जिल्ह्यातील नालासोपारा विधानसभा मतदारसंघ हा सर्वात मोठा असून त्यात आतापर्यंत ५ लाख १९ हजार ८२ मतदारांची नोंद झालेली आहे. मात्र या मतदारसंघातील मतदार नोंदणीचा गेल्या काही महिन्यांतील वाढलेला वेग पाहून संशयास्पदरीत्या नावे नोंदवली जात असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने यापूर्वीच केला होता. एक लाखांहून अधिक नावे बोगस असल्याचा आरोप करून तशी तक्रार त्यांनी मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली होती. आता या संशयास्पद नावांचा शोध घेऊन १९ हजार नावे बोगस असल्याचे पुरावे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केले. ही नावे बोगस असल्याचे पुरावे पक्षाचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत सादर केले.
बोगस मतदार शोधण्यासाठी मोहीम
याबाबत माहिती देताना पक्षाचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले की, बोगस मतदार असल्याची माहिती मिळताच आम्ही शोधमोहीम घेतली. त्यासाठी मतदारसंघातील याद्यांची इतर मतदारसंघातील याद्यांशी पडताळणी गेले काही दिवस करत होतो. त्यात १९ हजारांहून अधिक मतदारांची नावे, वय, लिंग एकसारखी आढळली. तसेच ५०० मतदार ओळखपत्र क्रमांकाच्या छाननीमध्ये एकाच व्यक्तीकडे दोन वेगवेगळ्या मतदारसंघांतील मतदार ओळखपत्रे असल्याचे आढळले. या मतदारांचे पूर्ण पत्ते नाहीत, त्यांची नावे आणि इतर कुटुंबीयांच्या सदस्यांची नावेही वेगळी असल्याचा आरोप ठाकूर यांनी केला आहे. गेल्या चार महिन्यांत अंधेरी, जोगेश्वरी, विलेपार्ले, कांदिवली या परिसरातील मतदार नालासोपारा मतदारसंघात नोंदविण्यात आले आहेत.
अंधेरीमधील १७ हजार नावे मागील काही दिवसांत नालासोपारामध्ये नोंदवली गेली. जी नावे नालासोपारा मतदारसंघात आहेत, त्याच व्यक्ती इतर मतदारसंघात आहेत. इतर मतदारसंघात त्यांचे पूर्ण पत्ते आहेत. मात्र नालासोपाऱ्यात अर्धवट पत्ता नोंदवण्यात आल्याचा आरोप हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे.
शासकीय आणि पोलीस यंत्रणा सज्ज
वारंवार तक्रारी करूनही जिल्हाधिकाऱ्यांनी दखल न घेतल्याने बहुजन विकास आघाडीने पक्षाच्या कार्यकर्त्यांनाच बोगस मतदारांची यादी देऊन त्यांना रोखण्याचे आदेश दिले आहेत. राजकीय वातावरण तापले असून पोलीस आणि शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. नालासोपाऱ्यातील सर्वच मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले आहे. कार्यकर्त्यांना मतदारांवर आक्षेप घेतला तर गोंधळ निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. मतदारांवर आक्षेप घेण्याचा अधिकार अन्य कुणाला नाही, यामुळे आम्ही नालासोपारा मतदारसंघातील पोलिसांना सतर्क राहण्यास सांगितल्याचे वसईचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी सांगितले.