जलवाहतुकीला सर्वपक्षीय पाठिंब्यासाठी काँग्रेस -राष्ट्रवादीने केले आवाहन
मुंबईलगतच्या परिसरात क्षेत्रीय प्रवासी जलवाहतुक सुरू करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून मुंबई, नवी मुंबई(ठाणे) आणि रायगड या तीन जिल्ह्य़ांना जलवाहतुकीने जोडले जाणार आहे. या रोल ऑफ रोल ऑन प्रवासी सेवेसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर निविदा मागवण्यात आल्या होत्या. प्रकल्पाच्या पर्यावरणीय सुनावणीसाठी आज, २१ फेब्रुवारीला रायगड जिल्हय़ातील सासवणे येथे सकाळी ११ वाजता जनसुनावणी होणार आहे. या सुनावणीत सर्व राजकीय पक्षांनी रो रो प्रकल्पाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन कॉँग्रेस – राष्ट्रवादीने केले आहे.
क्षेत्रीय जलवाहतुकीला चालना देण्यासाठी एमएसआरडीसीकडून भाऊचा धक्का, नेरळ आणि मांडवा या दरम्यान रो रो सेवा सुरू केली जाणार आहे. यासाठी तीनही ठिकाणी पॅसेंजर टर्मिनल विकसित केले जाणार आहे. अलिबाग तालुक्यातील मांडवा इथे पॅसेंजर टर्मिनल विकासासाठी १६० कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. यात टर्मिनल साठी ११० कोटी तर ब्रेक वॉटर बंधाऱ्यासाठी ४५ कोटी खर्च केले जाणार आहेत. प्रवासी वाहतुकीबरोबरच आणि वाहनांची वाहतूक या टर्मिनलमधून केली जाणार आहे. या प्रकल्पामुळे सध्या आठ महिने सुरू असणारी प्रवासी वाहतूक बारमाही होणार आहे. त्याचबरोबर चारचाकी वाहने थेट दक्षिण मुंबईत नेणे शक्य होणार आहे.
प्रकल्पामुळे इंधन आणि वेळेची बचत होणार असून एकाच वेळी ८० वाहनांची वाहतूक करणे शक्य होणार आहे. जिल्ह्य़ाच्या विकासाला या प्रकल्पामुळे चालना मिळणार असल्याचे मत माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी व्यक्त केले आहे. प्रकल्पाच्या जनसुनावणीच्या अनुषंगाने त्यांनी कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश धुमाळ, पक्ष प्रतोद महेंद्र दळवी, तालुका अध्यक्ष मिलिंद कवळे तर कॉँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मही पाटील तालुकाध्यक्ष अनंत गोंधळी आणि नगर पालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण ठाकूर उपस्थित होते. प्रकल्प तर यायला हवाच. त्याचबरोबर इथल्या पायाभूत सुविधांचाही विकास व्हायला हवा, असे मत ठाकूर यांनी व्यक्तकेले. जिल्ह्य़ाच्या पर्यटन विकासालाही या प्रकल्पामुळे चालना मिळेल, असा विश्वास या वेळी उपस्थितांनी व्यक्त केला. सर्व राजकीय पक्षांनी प्रकल्पाला सक्रिय पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी या वेळी केले. सासवण्यातील मच्छीमारांसाठी पर्यायी जेटीची व्यवस्था करण्यासाठी पुढाकार घेतला जाईल, असेही या वेळी ठरवण्यात आले.