शहराला मुबलक व शुद्ध पाणीपुरवठा मिळावा, यासाठी उच्च न्यायालयात पुढील आठवडय़ात जनहित याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती अ‍ॅड. सागर कासार यांनी दिली अनेक वर्षांपासून शहराचा पाणीप्रश्न गाजत आहे. लोकप्रतिनिधी, शासन, जिल्हाधिकारी, नगरपालिका प्रशासन या गंभीर प्रश्नावर उपाय शोधण्यात पूर्णपणे अयशस्वी ठरले आहे. मुबलक व शुद्ध पाणीपुरवठा या न्याय्य मूलभूत हक्कासाठी आता उच्च न्यायालयात जाण्याशिवाय पर्याय नाही, असे या संदर्भातील पत्रकात अ‍ॅड. कासार यांनी म्हटले आहे. मनमाड पाणीप्रश्न सोडविण्यासाठी आतापर्यंत विविध योजना व निधी जाहीर झाले, परंतु त्यांचा कोणताही उपयोग झालेला नाही. अशा परिस्थितीत नागरिकांनी राजकीय मतभेद विसरून एकजुटीने लढा देण्याची वेळ आली असल्याचेही त्यात म्हटले आहे. पालिकेच्या वीज थकबाकीमुळे देखील पाणीपुरवठय़ात अनियमितता होत आहे. शहराला सध्या महिन्यातून दोन वेळा रात्री-अपरात्री अनियमित, कमी दाबाने व दूषित पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. या प्रकरणी अ‍ॅड. व्ही. एम. कासार, अ‍ॅड. सुभाष डमरे, डॉ. विद्याधर मालते, अशोक परदेशी आदींनी या मोहिमेत नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घ्यावा, असे आवाहन केले आहे.