महात्मा गांधी यांची हत्या झाली, त्या ठिकाणची माती हातात घेऊन देशव्यापी दौऱ्यादरम्यान कार्यकर्ते गांधीजींच्या स्वप्नातील भारत उभा करण्यासाठी लढय़ाची शपथ घेतील, अशी माहिती ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. विवेकानंदांच्या जयंतीचे औचित्य साधून भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाच्या अत्याधुनिक कार्यालयाचे उद्घाटन माजी पोलिस अधिकारी किरण बेदी यांच्या हस्ते झाले. आंदोलनाचा देशभातील कारभार याच कार्यालयातून चालणार असल्याचे बेदी यांनी यावेळी सांगितले.
देशभरातील चारशे कार्यकर्त्यांंचे राष्ट्रीय प्रशिक्षण रविवारी झाले. हजारे यांच्यासह माजी लष्करप्रमुख व्ही़  के. सिंग, किरण बेदी, विश्वंभर चौधरी, अमरनाथ यांनी या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त आंदोलनाची माहिती देणाऱ्या संकेतस्थळाचेही हजारे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या संकेतस्थळास ट्विटर, फेसबुक, तसेच ब्लॉगही जोडण्यात आले असून या माध्यमातून देशभरातील कार्यकर्त्यांंना हवी ती माहिती मिळू शकेल. नव्या कार्यालयात ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून एका वेळी ३ कोटी लोकांच्या मोबाईलवर आंदोलनाचे संदेश जाऊ शकतील, अशीही व्यवस्था करण्यात आली आहे. जगभरातील कार्यकर्ते किंवा ठिकठिकाणच्या सभांना व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे संपर्क साधणेही नव्या कार्यालयातून शक्य होणार आहे. सीसी टीव्ही कॅमेरे, सीडी, पुस्तक विक्री कक्ष, सुसज्ज मिटिंग हॉल, तसेच आवश्यक तेथे वातानुकूलीत यंत्रणाही बसविण्यात आली आहे.
येत्या दि. ३० ला पटणा येथून देशव्यापी जनजागृती दौऱ्यास प्रारंभ झाल्यानंतर चार मोठय़ा सभा घेण्यात येणार आहेत. जनलोकपाल, दप्तर दिरंगाई, निवडणूक कायद्यात सुधारणा आणि राईट टू रिजेक्ट कायद्याची अंमलबजावणी, तसेच शेतकरी, शेतमजुरांच्या प्रश्नावर लढा दिला जाणार आहे. या आंदोलनासाठी ७५ पूर्णवेळ कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. देशभर दोन हजार कार्यकर्ते स्वयंसेवक म्हणून कार्यरत राहणार आसल्याचे हजारे यांनी यावेळी बोलताना सांगितले.