विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत अनपेक्षितपणे भाजपाला मोठा फटका बसला आहे. नागपूर आणि पुणे या भाजपने प्रतिष्ठेच्या केलेल्या पदवीधर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. पुणे मतदारसंघात तब्बल २० वर्षांनंतर भाजपाला पराभवाचं तोंड पाहवं लागलं आहे. नेहमी भाजपाला साथ देणाऱ्या पुणेकर मतदारांनी यंदा राष्ट्रवादीच्या पारड्यात मतं टाकून भाजपाच्या गडाला खिंडार पाडलं आहे. दरम्यान, यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“धुळे, नंदुरबार निर्णय हा अजिबात आश्चर्यकारक नाही. निर्वाचित होते त्यांच्या हाती मोठा वर्ग पूर्वीपासून होता. त्याचा विजय नव्हे, तो खरा विजय नाही. गेलं वर्षभर आम्ही काम करून दाखवलं आहे. यामध्ये मुख्यतः नागरपूची जागा कधीच मिळाली नव्हती. ती कॉग्रेसने जिंकली. हा महाराष्ट्रातील निकाल महाविकासआघाडीचा विजय आहे. महाविकासआघाडी सरकारने एकत्र काम केले. त्याचे यश असून पुणे मतदार संघात ही आम्हाला यश मिळवता आलं नव्हतं. मात्र आता सर्वसामान्य लोकांनीही महाविकासआघाडी सरकारला स्वीकारलं आहे. आजपर्यंत ज्यांना स्वीकारलं त्यापेक्षा वेगळा निकाल आला आहे. महाराष्ट्रतील चित्र बदललं आहे,” अशी प्रतिक्रिया  शरद पवार यांनी दिली.

“भाजपा प्रदेशाध्यक्षांचा विनोदी विधान करण्याचा लौकिक आहे. मागच्या वेळेस विधान परिषदेला चंद्रकांतदादा कसे निवडून आले ते सर्वांना माहित आहे. तसेच पुणे शहरातील त्यांच्या सोयीचा मतदारसंघ त्यांनी निवडला,” असं म्हणत त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावरही निशाणा साधला.

पुणे पदवीधर मतदार संघात एक लाख २२ हजार १४५ अशी सर्वाधिक मते घेत महाविकास आघाडीचे अरुण लाड विजयी झाले आहेत. भाजपाच्या संग्राम देशमुख यांना ७३ हजार ३२१ मते मिळाली. विजयासाठी एक लाख १५ हजार मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. हा कोटा लाड यांनी पूर्ण केल्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे.

आणखी वाचा- भाजपाच्या गडाला खिंडार; पुणे-नागपूरमध्ये महाविकास आघाडीचा झेंडा

नागपूरमध्येही भाजपाला धक्का

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला समजला जाणारा नागपूर पदवीधर मतदारसंघातही भाजपाला धक्का बसला आहे. पहिल्या पाचही फेरीमध्ये भाजपाची पिछेहाट आहे. महाविकास आघाडीनं भाजपाच्या गडाला सुरुंग लावत जोरदार मुसंडी मारली आहे. नागपूर मतदार संघात अभिजित वंजारी यांचा विजय झाला आहे. वंजारी यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली होती. भाजपाचे संदीप जोशी हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले.

आणखी वाचा- … हा तर मतदारांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास : सुप्रिया सुळे

औरंगाबादमधूनन सतीश चव्हाण यांची विजयाची हॅटट्रिक

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून सलग दोन वेळा विजयी ठरलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी विजयाची हॅटट्रिक साधली आहे. महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण पुन्हा एकदा विजयी झाले आहेत. सतीश चव्हाण यांना तब्बल १ लाख १६ हजार ६३८ मते मिळाली आहेत. तर भाजपाच्या शिरीष बोराळकर यांना ५८ हजार ७४३ मतांवर समाधान मानावं लागलं आहे.