सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या नवीन शैक्षणिक वर्षासाठी २४८ कोटी ४३ लाख ३६ हजार रुपये इतकी अपेक्षित रक्कम जमा गृहीत धरून २९८ कोटी २४ लाख ८६ हजार रुपयांच्या अर्थसंकल्पाला विद्यापीठ अधिसभेने मंजुरी दिली आहे.या अर्थसंकल्पात ४९ कोटी ८१ लाख ५० हजार रुपये इतकी तूट दर्शविण्यात आली आहे. विद्यापीठात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने उभारण्यात येणा-या अध्यासन केंद्रासाठी प्रत्येकी ३० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
बुधवारी, विद्यापीठात कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठ अधिसभेची अर्थसंकल्पीय सभा झाली. यावेळी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. सचिन गायकवाड यांनी अर्थसंकल्प मांडला.परीक्षा विभागांतर्गत पायाभूत सुविधा (५ कोटी), शास्त्रीय उपकरण केंद्र ( ३ कोटी), वृक्ष संवर्धनासाठी शासन मार्गदर्शनानुसार एक कोटी २० लाख रूपये, शिक्षकांच्या संशोधनास चालना मिळण्यासाठी सीड मनी संशोधन उपक्रम (३५ लाख), इनोव्हेशन, इनक्युबेशन अँड लिंकेजेसकरिता विद्यापीठ हिस्सा ( ५० लाख), कमवा व शिका योजना (१२लाख ५० हजार), मुलींचे उच्च शिक्षणातील प्रमाण वाढवण्यासाठी ‘मुली शिकवा, समाज घडवा’ उपक्रम (५ लाख) मराठी भाषा गौरव दिन ( ८ लाख), विद्यापीठातील शिक्षक व कर्मचाऱ्यांसाना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कार्यशाळा व परिसंवाद (१०), ग्रंथालय विकास निधी (७ लाख) याप्रमाणे आर्थिक तरतूद दर्शविण्यात आली आहे.