रविवारी सांगलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवंगत नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते हे अनावरण करण्यात आले. यावेळी पवारांनी आर. आर. पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला. ‘आर. आर. पाटील यांनी जीवाचा धोका पत्करून आबांनी कसाबला फाशी दिली,’ अशा शब्दामध्ये त्यांनी गृहमंत्री म्हणून आर. आर. पाटील यांनी केलेल्या कामाचे कौतूक केले.

सांगली येथे आर. आर. पाटील यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमामध्ये शरद पवार यांनी भाषण दिले. यामध्ये त्यांनी आबांच्या काही आठवणी सांगितल्या. त्यामध्येच त्यांनी दहशतवादी अजमल कसाबला फाशी देण्याचा निर्णय आणि त्यावेळेस आबांनी घेतलेल्या भूमिकेबद्दलचा किस्सा सांगितला. “मुंबई २६/११ हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबला फाशी देण्याच्या वेळी केंद्रीय गृह मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने सावधानतेचा इशारा दिला होता. कसाबला फाशी दिल्यास राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो असा इशारा या आधिकाऱ्याने दिला होता. इतकेच नाही तर महाराष्ट्रातील ज्या गृहमंत्र्याच्या काळात कसाबला फाशी दिली जाईल, त्या गृहमंत्र्याच्या जीवाला आयुष्यभर धोका राहिल, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्याने दिली होती. मी याबद्दलची माहिती आर. आर. आबांना दिली. मात्र, त्यांते खंबीरपणे आपल्या निर्णयावर कायम राहिले. त्यांनी निर्भीडपणे कायदा-सुव्यवस्थेची जबाबदार पार पाडली आणि कसाबला आर. आर पाटील गृहमंत्री असतानाच फाशी देण्यात आली,” असं शरद पवार म्हणाले.

२१ नोव्हेंबर २०१२ रोजी कसाबला पुण्यातील येरवडा तुरुंगामध्ये फाशी देण्यात आली. अत्यंत गुप्त पद्धतीने १९ नोव्हेंबर रोजी त्याला मुंबईतून पुण्यातील येरवडा तुरुंगात हलवण्यात आले होते. यावेळी आर. आर. पाटील हे राज्याचे गृहमंत्री होते.

तंबाखू सोडण्याचा सल्ला

आर. आर. पाटील यांच्या आठवणींना उजाळा देताना पवार यांनी आपण आबांना अनेकदा तंबाखू खाणे थांबवण्याचा सल्ला दिला होता असं सांगितलं. ‘हे तोंडात तंबाखू टाकणं बंद करा. तुमची सुपारी, तंबाखू जे काही आहे ते खाणं तुम्ही थांबवलं पाहिजे असं मी त्यांना अनेकदा सांगलं होतं. हे मी माझ्या अनुभवाने त्यांना सांगितलं. मी एकेकाळी त्या रस्त्यानं जात होतो. त्याचा परिणाम माझ्या तोंडावर झाला. पण मी थांबलो आणि वेळीच काळजी घेतली. तुम्ही थांबवा आणि वेळीच काळजी घ्या. मला माहितीय यातले उत्तम डॉक्टर कोण आहेत. आपण सगळी व्यवस्था करु असंही सांगितलं. त्यांना घेऊनही गेलो डॉक्टरांकडे. डॉक्टरांनी त्यांना काळजी घ्यायला सांगितली. त्यांनी काळजी घेतली नाही. त्यांनी डॉक्टरांनी सल्ला घेतला पण कृतीत आणला नाही. शेवटी त्या रोगानं त्यांच्यावर घाला घातला आणि ते निघून गेले,’ अशी खंत पावर यांनी व्यक्त केली. ‘माझं वय ८० त्यांच वय आज ६०-६१ असतं. माझ्या २० वर्ष आधी ते गेले. त्यांना जायचा काय अधिकार होता. माझं जाण्याचं वय होतं. माझ्यासारख्याला मागे ठेऊन तुम्ही माझ्याआधी गेलात ही गोष्ट मला पटली नाही. तुमच्या कर्तृत्वाला अजून बहार यायचा होता. तुमच्या कर्तृत्वाचं समग्र चित्र महाराष्ट्राच्या घराघरात पोहचायचं होतं. तुम्ही अचानक सोडून गेलात. हे काही योग्य केलं नाही. तुमच्या जाण्याचं दु:ख माझ्या अंतकरणामध्ये कायम राहिलं,’ असं पवार भावूक होऊन म्हणाले.