अवकाळी पावसाने जिल्ह्यातील ६५ हजार एकरातील रब्बी हंगामातील पिके उद्ध्वस्त झाली असून बेदाण्याचे नुकसानही प्रचंड झाले आहे. अवकाळीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून जिल्ह्यात सर्वाधिक तडाखा द्राक्षाला बसला आहे. अवकाळीने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला तातडीने मदत देण्यात यावी अशी मागणी शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.
जिल्ह्यात रविवार व सोमवार असे दोन दिवस अवकाळी पावसाने हजेरी लावली. रविवारी सरासरी ५.४ तर, सोमवारी सकाळपर्यंत १७.८६ मिलीमीटर पाउस झाला. या पावसाने रब्बी ज्वारीसह, हरभरा, मका, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. प्राथमिक नजर आणेवारीनुसार आटपाडी तालुका वगळता जिल्ह्यातील सर्व तालुक्यात पावसाने हानी झाली आहे.
जिल्ह्याचे प्रभारी जिल्हाधिकारी सतीश लोखंडे यांनी सांगितले की, अवकाळी पावसाने २२ हजार २७४ हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिकांचे तर ४ हजार २३ हेक्टर क्षेत्रातील द्राक्ष पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे लेखी आदेश सर्व तहसीलदारांना देण्यात आले आहेत. गावकामगार तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवक आणि एक स्थानिक पदाधिकारी यांच्या समितीमार्फत हे पंचनामे करण्यात येत आहेत.
जिल्ह्यात पीकनिहाय नुकसान झालेले क्षेत्र पुढीलप्रमाणे आहे. ज्वारी १६ हजार ४७६ हेक्टर, गहू ३ हजार ७१४, हरभरा १ हजार ९२३, मका ९०, हळद १५, भाजीपाला ५५.६०, द्राक्षे ४ हजार २३.६५ हेक्टर असे नुकसान झाले आहे. तसेच ४ हजार १०० टन बेदाणा अवकाळी पावसाने भिजल्याने मातीमोल ठरला आहे.
जिल्ह्यात या अगोदर नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप शासनाची मदत मिळाली नसल्याचे उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी सांगितले. नोव्हेंबरमध्ये १३५१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे १ कोटी ६१ लाख २८ हजाराचे तर डिसेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने १६२९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे १ कोटी ४८ लाख ६७ हजार रुपयांचे नुकसान झाले होते. या नुकसानीची अद्याप शेतकऱ्याना काहीही मदत मिळाली नाही.
दरम्यान, जिल्ह्यात अवकाळी पावसाने सुमारे ४४ कोटीचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना तातडीची मदत शासनाने द्यावी अशी मागणी शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी एका निवेदनाद्वारे प्रभारी जिल्हाधिकारी श्री लोखंडे यांच्याकडे केली आहे.