टय़ुनिशियाचे संविधान शिल्पकार शेख राशिद गनुसी यांनी भारतीय उद्योजकांना टय़ुनिशियात उद्योग उभारण्याचे आवाहन केले आहे. येमेन, सिरिया अशा ‘इसिस’ग्रस्त प्रदेशातील इस्लामी राष्ट्रांत धर्मनिरपेक्ष लोकशाही रुजविण्याचे श्रेय असणाऱ्या शेख गनुसी यांना यावर्षीचा जमनालाल बजाज पुरस्कार लाभला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर ते गांधीवादी संस्थांच्या पाहणीसाठी वर्धा भेटीवर आले होते. सायंकाळी त्यांनी खास ‘लोकसत्ता’शी संवाद साधला. भविष्यात टय़ुनिशियात जागतिक व्यापार परिषदेचे आयोजन केले आहे. भारतीय उद्यमींनी यात सहभागी व्हावे, त्यांना सर्व ते सहकार्य मिळेल. आमच्या देशाची आर्थिक व्यवस्था पर्यटन व्यवसायावर आधारित आहे. सुंदर किनारे, इतिहासकालीन म्युझियम्स, सुसह्य़ वाहतूक व दळणवळण ही आमची ‘अॅसेट’ आहे.
१९८१ साली त्यांनी इस्लाम सुधारणा व टय़ुनिशियाच्या जीवनात सांस्कृतिक , सामाजिक, शैक्षणिक बदल करण्याहेतूने ‘इस्लामिक टेंडंसी मूव्हमेंट’ ही संघटना स्थापन केली. ‘द नॉन मुस्लिम राईट्स इन मुस्लिम सोसायटी’ हे पुस्तक लिहून त्यांनी मुस्लिमेतर जनतेच्या अधिकारांना मान्य केले. २०११ च्या क्रांतीनंतर ते देशात परतले. निवडणुकीत त्यांच्या पक्षाने ४१ टक्के जागा जिंकल्या. अन्य दोन धर्मनिरपेक्ष पक्षाच्या सहकार्याने त्यांचा पक्ष सत्तेवर आला. त्यांच्याच पुढाकाराने राष्ट्रीय संविधान सभेत पक्षाच्या एकूण ८९ सदस्यांपैकी ४२ महिला निवडण्यात आल्या. गनुसी म्हणाले, इस्लाम व लोकशाहीच्या चिरंतन मूल्यांना सांधण्याचे काम मला करावे लागले. या दोन्ही घटकातील उदारतावाद्यांशी समन्वय साधून लोकशाही मार्गाने निवडणूक व नागरी अधिकारांचा पुरस्कार करणारे संविधान तयार झाले. २७ जानेवारी २०१४ ला संविधानात अंमलात आले. गनुसी यांना गांधीजींचे किंवा त्यांच्यावर लिहीलेले कोणते पुस्तक वाचले, अशी विचारणा केल्यावर ते थोडे अंतर्मुख झाले. मात्र कोणत्याही साहित्यातील कोणत्या पुस्तकांनी तुम्हाला प्रेरणा दिल्याचे विचारल्यावर ते म्हणाले, मी प्रामुख्याने लॅटिन अमेरिकन साहित्य वाचले आहे. या पुस्तकांतून मला उदारमतवाद समजला. लोकशाही मूल्ये कळली. पुढे नेल्सन मंडेलाचे साहित्य वाचले. गांधीही वाचणार आहे. संस्थाध्यक्ष संजय भार्गव, प्राचार्य डॉ. ओम महोदय यांनी या संवादात सहभाग दिला.