‘महिलांचे फोन टॅप करतात, त्यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी सर्व व्यवस्था कामाला लावतात, ते नरेंद्र मोदी महिलांना सक्षम काय करणार? आधी महिलांना आदर द्यायला शिका आणि मग त्यांच्या सक्षमीकरणाबद्दल बोला,’ अशी टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींवर केली.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डॉ. विश्वजित कदम यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी यांची मंगळवारी पुण्यात सभा झाली. या वेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण, काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश आदी उपस्थित होते.
‘महिलांचे सक्षमीकरण करण्याच्या जाहिराती मोदी करत आहेत. मात्र, महिला आरक्षण विधेयक हे भाजपच्या विरोधामुळे संमत होऊ शकले नाही. छत्तीसगडमध्ये महिला गायब होत आहेत. गुजरातमध्ये महिलांचे फोन टॅप होत आहेत आणि हेच लोक दिल्लीमध्ये महिलांचे सक्षमीकरण करणार असल्याच्या जाहिराती लावत आहे. जे महिलांचे फोन टॅप करतात, त्यांची माहिती काढण्यासाठी सर्व व्यवस्था कामाला लावतात, ते महिलांना काय सक्षम करणार? महिलांबद्दल आधी आदर बाळगा  मग सक्षमीकरणाबद्दल बोला.  देशात प्रेम आणि द्वेष अशा दोनच विचारधारा असून काँग्रसने प्रेमाची विचारधारा स्वीकारली आहे’, असे या वेळी राहुल गांधी म्हणाले.

‘विश्वजित, हिंदीतून बोला..’
पुण्यात मतदारांशी संवाद साधताना विश्वजित कदम यांनी थेट इंग्रजीतून भाषण करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला काही वाक्ये बोलल्यानंतर  स्वत: राहुल गांधी यांनी हिंदीतून बोलण्याची सूचना केली. नंतर विश्वजित हिंदीतून बोलायला लागले.