शासकीय गोदामातील धान्य रेशन दुकानात नेण्याऐवजी खासगी गोदामात आणून तसेच शासकीय शिक्का असलेल्या पोती बदलून त्यातील धान्य अन्य पोत्यांमध्ये भरून त्याची काळ्या बाजारात विक्री करण्याची तयारी सुरू असलेल्या शहापूर येथील रमेश अग्रवाल यांच्या दोन गोदामांवर मुंबई येथील राज्यस्तरीय दक्षता पथकाने शनिवारी सायंकाळी धाड टाकली. यामध्ये सुमारे ४५० क्विंटल गहू व तांदळासह एक टेम्पो, असा सुमारे २० लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे. तसेच या दोन्ही गोदामांना सील ठोकण्यात आले आहे.
शहापूर येथील मुंबई-नाशिक महामार्गालगत असलेल्या कोकण विकास महामंडळाचा गाळा नंबर एबी-१० तसेच गंगारोड येथील बजाज राइस मीलच्या आवारात व्यापारी रमेश अग्रवाल यांची गोदामे आहेत. या दोन्ही गोदामांवर मुंबई येथील राज्यस्तरीय दक्षता पथकाने शनिवारी धाड टाकली. त्यावेळी पथकाला एफसीआय गव्हर्मेट ऑफ पंजाब, असा शिक्का असलेली गहू व तांदळांची पोती आढळून आली. तसेच शासकीय शिक्का असलेल्या या पोत्यांमधील गहू व तांदूळ गोल्डन रिंग ब्रँड राम इंडस्ट्रीज, लातूर आणि ताज ब्रँड प्रेसिडेंट तुरडाळ रामशेट लातूर, असा शिक्का असलेल्या पोत्यांमध्ये भरण्याचे काम सूरू होते. तसेच या धान्याच्या पोत्या टेम्पोमध्ये भरण्याचीही प्रक्रियाही वेगाने सुरू असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. त्यानुसार पथकाने दोन्ही गोदामांवर कारवाई करून ३७९ क्विंटल तांदुळाच्या ७३६ पोती, ६० क्विंटल गव्हाच्या ११७ पोती, अशा धान्य साठय़ासह टेम्पोही जप्त करण्यात आला आहे. सुमारे १९ लाख ४५ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
मुंबई येथील शिधावाटप नियंत्रक व संचालक नागरी पुरवठा तथा राज्यस्तरीय दक्षता पथकाच्या अध्यक्षा डॉ. अश्विनी जोशी यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. शिधावाटप उपनियंत्रक डॉ. रत्नदीप गायकवाड व त्यांच्या १३ सहकाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणी जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये रमेश अग्रवाल यांच्यावर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पथकाचे प्रमुख डॉ. गायकवाड यांनी सांगितले. जप्त करण्यात आलेले धान्य कोणत्या रेशन दुकानाचे होते व ते कुठे नेण्यात येणार होते, याची चौकशी सुरू झाल्याने आता रेशन धान्य दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 31st Dec 2012 रोजी प्रकाशित
शहापूर येथील धान्य गोदामांवर धाड
शासकीय गोदामातील धान्य रेशन दुकानात नेण्याऐवजी खासगी गोदामात आणून तसेच शासकीय शिक्का असलेल्या पोती बदलून त्यातील धान्य अन्य पोत्यांमध्ये भरून त्याची काळ्या बाजारात विक्री करण्याची तयारी सुरू असलेल्या शहापूर येथील रमेश अग्रवाल यांच्या दोन गोदामांवर मुंबई येथील राज्यस्तरीय दक्षता पथकाने शनिवारी सायंकाळी धाड टाकली.
First published on: 31-12-2012 at 01:11 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raid in food warehouse tempo seize