मागील दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आठवडाभरात पावसाने तिसऱ्यांदा हजेरी लावली. लोहारा तालुक्यात सर्वाधिक, तर भूम तालुक्यात सर्वात कमी पाऊस झाला. पावसाळ्यापूर्वी तीन महिन्यांपासून ते आजतागायत पावसादरम्यान वीज खंडित होऊ नये, म्हणून झटणाऱ्या महावितरण कंपनीच्या नियोजनाचे किरकोळ पावसात वाभाडे निघाले आहेत. पाच मिनिटे झालेल्या जोराच्या पावसात दोन ठिकाणी वीज तारा तुटल्याने निम्मे शहर रात्रभर अंधारात होते. गुरुवारी दुपापर्यंतही विजेचा लपंडाव सुरू होता. त्यामुळे व्यापाऱ्यांसह शहरवासीयांची मोठी गरसोय झाली.
तुळजापूर, उस्मानाबाद व लोहारा तालुक्यात बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास पावसाची रिपरिप सुरू झाली. त्यातच जोराचे वादळ सुटल्याने दाटून आलेले ढग पुढे गेले. त्यामुळे काही ठिकाणी कमी-अधिक पाऊस झाला. तुळजापूर तालुक्यातील सलगरा मंडळ परिसरात सर्वाधिक ६४ मिमी पाऊस झाला. या पाठोपाठ उस्मानाबाद तालुक्यातील जागजी येथे ५८, लोहारा मंडळात ४५, कळंब मंडळ २६, परंडा मंडळ १५, तर वाशी मंडळात ११ मिमी पावसाची नोंद झाली. भूम शहर व तालुक्यात फक्त १.२० मिमी पाऊस झाला. भूम, लोहारा, उमरगा व परंडा तालुक्यात मृग नक्षत्रात पावसाने बऱ्यापकी हजेरी लावल्यामुळे या तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली होती. मात्र, दोन महिने पाऊस न झाल्याने ही पिके वाया गेली आहेत.
मागील आठवडय़ानंतर तिसऱ्यांदा पावसाने कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना काहीअंशी दिलासा मिळाला आहे. यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्न काही दिवसांपुरता का होईना मिटला. बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसात मध्यवर्ती बसस्थानकासमोर, उस्मानाबाद जनता सहकारी बँकेच्या मागे व तांबरी भागातील िलबोणी बाग परिसरात झाडे तुटून विजेच्या तारांवर पडली. त्यामुळे तिन्ही ठिकाणच्या तारा तुटून वीजपुरवठा खंडित झाला. रात्री दोनपर्यंत महावितरणचे १० कर्मचारी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करीत होते. पावसाळ्यापूर्वी वादळी वारे आणि झाडांमुळे होणारा धोका लक्षात घेऊन महावितरणने प्रयत्न केले होते. मात्र, काही ठिकाणी हलगर्जीपणा झाल्यामुळे गुरुवारी पहाटेपर्यंत निम्म्या शहरवासीयांना अंधारात राहावे लागले.
जिल्ह्यात बुधवारी एकूण १२ मिमी पाऊस झाला. उस्मानाबाद तालुक्यात १५.२५, तुळजापूर १७.१४, उमरगा १३.६०, लोहारा ३७.३३, कळंब १२.१७, भूम १.२०, वाशी ३.६७, परंडा ३.४० मिमी पावसाची नोंद झाली.
संग्रहित लेख, दिनांक 21st Aug 2015 रोजी प्रकाशित
दोन महिन्यांची प्रतीक्षा संपवून उस्मानाबादेत पाऊस बरसला
मागील दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आठवडाभरात पावसाने तिसऱ्यांदा हजेरी लावली. लोहारा तालुक्यात सर्वाधिक, तर भूम तालुक्यात सर्वात कमी पाऊस झाला. पावसाळ्यापूर्वी तीन महिन्यांपासून ते आजतागायत पावसादरम्यान वीज खंडित होऊ नये, म्हणून झटणाऱ्या महावितरण कंपनीच्या नियोजनाचे किरकोळ पावसात वाभाडे निघाले आहेत.
First published on: 21-08-2015 at 01:20 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rain in osmanabad after two months waiting