सर्वसाधारणपणे दर तीन वर्षांनी प्रकट होण्याची प्रथा असलेल्या राजापूरच्या गंगेचे जेमतेम तीन महिन्यात पुनरागमन झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एक वर्षांच्या वास्तव्यानंतर २३ मार्च रोजी या गंगेचे निर्गमन झाले होते. त्यामुळे ती एवढय़ा कमी काळात पुन्हा अवतीर्ण होण्याची शक्यता नव्हती. पण गेल्या सोमवारी मूळ गंगा आणि गायमुखातून पाण्याचा जोरदार प्रवाह सुरू झाल्याचे नजरेस पडले. तसेच अन्य कुंडांमध्येही भरपूर पाणी दिसून आले. त्यामुळे अन्य स्थानिक ग्रामस्थांनीही तेथे धाव घेतली. भर पावसाळ्यात गंगेचे अशा प्रकारे आगमन यापूर्वीही झाले असून तिचा कालावधी किमान १२ दिवस (जुलै १९३६) ते ४८ दिवस (जुलै १९५५) राहिला आहे. त्यामुळे यावेळी गंगा किती काळ राहणार, याबद्दल भाविकांमध्ये उत्सुकता आहे. सर्वसाधारणपणे ही गंगा दर तीन वर्षांनी अवतीर्ण होण्याचा परिपाठ आहे. पण गेल्या काही वर्षांत हे चक्र बिघडले आहे. या वेळी झालेले गंगेचे पुनरागमन सर्वात कमी काळानंतर झाले आहे. या बदलत्या घडामोडींमागील शास्त्रीय कारण स्पष्ट झालेले नाही. पण भूगर्भातील हालचालींशी त्याचा संबंध असावा, असे मानले जाते.