खासदार राजू शेट्टी यांची भूमिका

स्वाभिमानी शेतकरी संघटना सर्व राजकीय पक्षांशी समांतर संबंध ठेवून आहे. शेतकऱ्यांच्या न्याय, हक्कांसाठी आम्ही संसदेत केलेल्या मागण्यांची पूर्तता केल्यास शेतकरी कर्जमुक्त होईल आणि देशातील शेतकरी कर्जमुक्त होणार असेल तर, भाजपला साथ करण्याचा विचार करू असे खासदार राजू शेट्टी यांनी सातारा येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

सांगली व जळगाव महापालिकांच्या निवडणूक निकालाने भाजपने हुरळून जाण्याचे कारण नाही. कारण शहरातील प्रास्थापित राजकारण्यांना सत्तेत राहणे अंगवळणी पडल्याने हा भाजपचा विजय दिसून येत आहे. परंतु, येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकात सत्ता बदलाची जनतेची मानसिकता असल्याचे शेट्टी म्हणाले. २०१४ पूर्वीच्या स्थानिक निवडणुकात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस विजयी होत होते. पण, लोकसभा व विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही पक्ष भुईसपाट झाल्याने शहरातील प्रास्थापित राजकारण्यांनी वारा येईल तशा टोप्या बदलल्याचे सांगली व जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत दिसून आल्याचे खासदार शेट्टी यांनी स्पष्ट केले. संविधान वाचलं पाहिजे यासाठी ‘संविधान बचाव’ची सर्वप्रथम रॅली आपण काढली. भारतीय संविधान सर्व धर्म समभावाची शिकवण देते. पण, वेगवेगळय़ा रंगाचा आधार घेऊन दहशत माजवली जात असेल तर ते घटनाविरोधीच असून, कुठल्याही रंगाचा दहशतवाद हा घातकच आहे. अशा शब्दात कोणत्याही पक्ष संघटनेचा नामोल्लेख न करता शेट्टी यांनी जातीयवादी अतिरेकावर टीका केली. राजरोसपणे गोळय़ा घालून पलायन करणारे वर्षांनुवष्रे सापडत नाहीत. हे असे कसे होते? अशी चिंता व्यक्त करून, डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या झाली. आमचाही नंबर लागेल म्हणून घाबरून रहायचे का? असा सवाल शेट्टी यांनी केला. साखर कारखान्यांकडून उसाच्या एफआरपीची रक्कम थकल्याने आम्ही पुण्याच्या साखर आयुक्तालयावर मोर्चा काढला यावर आयुक्तांनी साखर कारखानदारांना चाप लावल्याने ऊस उत्पादकांना १,४०० कोटी रुपयांची एफआरपीची रक्कम अदा झाली. परंतु, काही कारखान्यांनी एफआरपी रखडवल्याने त्यातील पाच साखर कारखान्यांवर जप्तीचे आदेश साखर आयुक्तांनी बजावले. परंतु, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आयुक्तांच्या आदेशाला स्थगिती दिली. तरी, सहकारमंत्र्यांची ही भूमिका राजकीय की आर्थिक लाभाची असा सवाल शेट्टी यांनी केला. हा स्थगिती आदेश लगेचच मागे घेतला जावा म्हणून सहकारमंत्र्यांना घेराव घालून जाब विचारणार असल्याचा इशारा शेट्टी यांनी दिला.