संगमेश्वर येथील वृत्तपत्र विक्रेते रंगनाथ खातू (६०) यांचे मंगळवारी कोल्हापूर येथे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्य़ाने आकस्मिक निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाबद्दल संगमेश्वरसह वृत्तपत्र क्षेत्रात तीव्र दु:ख व्यक्त करण्यात येत आहे.
रंगनाथ खातू यांच्या मुलाचे लग्न जानेवारी महिन्यात असल्याने निमंत्रणपत्रिका देण्यासाठी ते कोल्हापूर येथे गेले होते. आज सकाळी ७ वाजता कोल्हापूर-चिपळूण या बसने ते परतणार होते. मात्र बसमध्ये बसल्यावर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने नातेवाईकांना लगेचच त्यांना उपचारार्थ हलविले, परंतु उपचारापूर्वी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्य़ाने त्यांची प्राणज्योत मालवली.
संगमेश्वर येथे सुमारे ४५ वर्षांपूर्वी द्वाविरंगेल बंधू या आपल्या ६ भावांच्या संक्षिप्त नावाने खातू यांनी वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय सुरू केला. राज्यस्तरासह स्थानिकांनी परराज्यातील वृत्तपत्र व साप्ताहिके हमखास मिळण्याचे संगमेश्वरमधील हे एकमेव ठिकाण होते. वृत्तपत्र वितरणातील मोठय़ा अनुभवामुळे मालकवर्ग, संपादकीय विभाग, वितरण विभाग आणि वृत्तपत्र प्रतिनिधी या सर्वाजवळ त्यांचे स्नेहाचे संबंध होते. रंगनाथ खातू यांनी नावडी-संगमेश्वरचे सरपंच म्हणूनही काम पाहिले होते. त्यांची कारकीर्द अविस्मरणीय होती. कसबा येथील काळभैरव मंदिर विश्वस्त समितीचेही ते जबाबदार पदाधिकारी म्हणून काम पाहात होते. आज सकाळी अचानक त्यांच्या निधनाचे वृत्त संगमेश्वर येथे आल्यावर हळहळ व्यक्त करण्यात आली. संगमेश्वर बसस्थानक परिसरातील सर्व व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहिली. संगमेश्वर तालुका पत्रकार संघानेही रंगनाथ खातू यांच्या अकाली निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.
रात्रौ ८ वाजता संगमेश्वर येथील स्मशानभूमीत खातू यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, वृत्तपत्रांचे प्रतिनिधी, प्रतिष्ठित ग्रामस्थ, वैद्यकीय व्यावसायिक, व्यापारी वर्ग, वृत्तपत्र विक्रेते आदी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सून असा परिवार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 13th Dec 2012 रोजी प्रकाशित
रंगनाथ खातू यांचे निधन
संगमेश्वर येथील वृत्तपत्र विक्रेते रंगनाथ खातू (६०) यांचे मंगळवारी कोल्हापूर येथे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्य़ाने आकस्मिक निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाबद्दल संगमेश्वरसह वृत्तपत्र क्षेत्रात तीव्र दु:ख व्यक्त करण्यात येत आहे.
First published on: 13-12-2012 at 03:50 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rangnath khatu passed away