सतरा वर्षांच्या एका शालेय विद्यार्थिनीला वाटेत अडवून तिला चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी आसिफ महमंद खान महालदार (वय २१, रा. महालदारवाडी-तळवडे, ता. लांजा) याला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला सहा दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. ही घटना शुक्रवारी घडली.
याबाबत लांजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लांजा तालुक्यातील तळवडे गावातील एक मुलगी एका प्रशालेत १०वीमध्ये शिकत आहे. ती शुक्रवारी सकाळी पायवाटेने शाळेकडे निघाली असता त्याच गावच्या महालदार वाडीतील रहिवासी आसिफ महंमदखान महालदार याने सकाळी सुमारे सव्वादहा वाजता गावातील ‘पिराचा माळ’ या जंगलमय भागात तिला अडविले आणि बळजबरीने खेचत नेऊन रेल्वेमार्गालगतच्या गटारात ढकलून दिले.
यानंतर त्याने चाकूचा धाक दाखविला. त्यामुळे ती मुलगी बेशुद्ध पडली आणि बेशुद्धावस्थेतच आसिफ महालदार याने तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान अध्र्या-पाऊण तासानंतर शुद्धीवर आलेल्या  त्या मुलीला आपल्यावर महालदार याने अत्याचार केल्याचे लक्षात आले. त्यावेळी महालदार याने ‘माझ्याबरोबर लग्न केले नाहीस. तसेच झालेला प्रकार कोणाला सांगितलास, तर तुला ठार मारीन’ अशी धमकी दिली.
याप्रकरणी बलात्कारित विद्यार्थिनी आणि तिच्या पालकांनी लांजा पोलीस  ठाण्यात शनिवारी (२ फेब्रु.) तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आसिफ महालदार  याला अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला सहा दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पो. निरीक्षक रामचंद्र गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दीपिका जौंजाळ या अधिक तपास करीत आहेत.