*  उजव्या बाजूला हृदय असलेल्या रुग्णाला जीवदान
*  जगातली पहिली यशस्वी शस्त्रक्रिया असल्याचा डॉक्टरांचा दावा
उजव्या बाजूला हृदय असलेल्या रुग्णावर सेठ नंदलाल धूत रुग्णालयात यशस्वी अँजिओप्लास्टी करण्यात आली. जगातील अशा स्वरुपाची ही पहिली शस्त्रक्रिया मानली जाते. डॉ. विलास मगरकर व डॉ. प्रवीर लाठी यांनी बायो अ‍ॅब्सॉर्बल (विरघळणारा) स्टेंट या तंत्राचा वापर करून ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया पार पाडली.
संजय जामदार (वय ३२) यांना या शस्त्रक्रियेने जीवदान मिळाले. जामदार यांच्या हृदयात तीव्र वेदना होत होत्या. डॉ. सुहास तायडे (चिखली, जिल्हा बुलढाणा) यांनी या रुग्णाला पुढील उपचारासाठी धूत रुग्णालयात डॉ. मगरकर यांच्याकडे पाठविले. रुग्णाचे हृदय उजव्या बाजूला आहे, हे माहीत असूनही त्यांना जीवदान मिळण्यासाठी अँजिओप्लास्टी करणे आवश्यक होते. अशा स्वरुपाच्या रुग्णांचे प्रमाण दहा हजारांत एक असते. तसेच अशा रुग्णावर क्वचितच अँजिओप्लास्टी झाली आहे. पण जगात नव्यानेच अवलंब होत असलेले बायो अ‍ॅब्सॉर्बल स्टेंट हे तंत्र तरुण रुग्णासाठी वरदान ठरत आहे.
उजव्या बाजूला हृदय असणाऱ्या रुग्णावर अँजिओप्लास्टी करणे हे खूपच कठीण असते. कारण अँजिओप्लास्टी करताना संगणकाच्या पडद्यावर हृदयाची प्रतिमा वेगळी किंवा उलटीही दिसते. त्यामुळे अशी अँजिओप्लास्टी करण्यासाठी दीर्घ अनुभव, अत्याधुनिक कॅथलॅब, कुशल मनुष्यबळ लागते. धूत रुग्णालयात या सर्व बाबी एकाच छताखाली उपलब्ध आहेत. डॉ. मगरकर यांनी यापूर्वी उजव्या बाजूला हृदय असणाऱ्या रुग्णांवर दोन शस्त्रक्रिया (२० नोव्हेंबर २००८ व २३ मार्च २०१०) केल्या आहेत. मागील ५ वर्षांत तिसरी यशस्वी शस्त्रक्रिया त्यांनी पार पाडली.
बायो अ‍ॅब्सॉर्बल स्टेंट हा नवीन तंत्रज्ञानाने तयार केलेला स्टेंट असून दोन वर्षांच्या आत विरघळून जातो आणि ब्लॉक असलेल्या रक्तवाहिन्या सर्वसाधारण (नॉर्मल) ठेवतो. या स्टेंटमधील महत्त्वाचा घटक रक्तवाहिनी पुन्हा ब्लॉक होऊ देण्यास प्रतिकार करतो.