|| सीताराम चांडे

रुग्णाचा खराब झालेला जबडा काढून त्या जागेवर पायाचे हाड, मांसपेशी व त्वचा यांपासून तयार केलेला नवीन जबडा थ्रीडी तंत्रज्ञानाच्या साह्यने संगणकीय सॉफ्टवेअरचा वापर करून योग्यपद्धतीने शस्त्रक्रियेद्वारे रुग्णास बसविण्यात आला. ही आव्हानात्मक दुर्मीळ शस्त्रक्रिया राज्याच्या ग्रामीण भागात प्रथमच तालुक्यातील लोणी येथील प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या ग्रामीण दंत वैद्यकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी केली, त्यातून रुग्णास नवी उमेद मिळाली आहे.

छत्तीसगड राज्यातील बिलासपूर येथील रीना साहू (वय १५ वर्ष)असे या रुग्णाचे नाव आहे.  या मुलीच्या तोंडाच्या जबडय़ात गाठ तयार झाली होती. ती गाठ असाध्य रोगाची आहे  असे समजून तिने विविध रुग्णालयात तपासण्या केल्या परंतु त्यावर उपचार होऊ  शकले नाही. अखेर या रुग्णाला बिलासपूर येथील शासकीय रुग्णालयातून लोणी येथे दंत महाविद्यालयातील  विभागात  पाठवण्यात आले.  नंतर रुग्णाचा जबडा पूर्ववत होण्यासाठी  खराब झालेला जबडा काढून त्या जागेवर नवीन जबडा बसण्याचेआव्हान डॉक्टर व वैद्यक  तंत्रज्ञांनी स्वीकारले,  त्यानुसार सर्वप्रथम डॉक्टरांनी पायाच्या हाडाचा काही भाग काढून त्यापासून जबडय़ाचे प्रारूप तयार केले.

हे प्रारूप तयार केल्यानंतर पायाचे हाड व तयार केलेले प्रारूप बेंगलोर येथील नामांकित संगणकीय दंत संशोधन केंद्रात पाठविले व रुग्णास आवश्यक असलेल्या मोजमापाचा जबडा तयार करून घेतला. पायाच्या हाडापासून तयार केलेला हा जबडा सलग बारा तास मायक्रो व्हॅस्क्यूलर अशा  शस्त्रक्रियेद्वारे जोडण्यात आला. दंत विभागातील तसेच प्रवरा ग्रामीण रुग्णालयातील डॉ अमित शहा, डॉ अनुज दधीच, डॉ हरीश सलूजा, डॉ आदित्य दमानी, डॉ नीलेश तायडे यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वी केली.

कशी केली शस्त्रक्रिया

रुग्णाचे वय कमी असल्यामुळे  ओस्टीओ थ्रीडी या तंत्रज्ञानाच्या साह्यने  तिच्यावर यशस्वी उपचार केले, अशी माहिती डॉ. समित शहा यांनी दिली.  रुग्णावर शस्त्रक्रिया करण्याच्या अगोदर तिच्या पायाच्या जबडय़ाला तीन पद्धतीने कोन घेऊन साचा बनविला व शस्त्रक्रिया करण्यात आली त्यामुळे रुग्णाच्या चेहऱ्यात फरक पडला नाही. शस्त्रक्रिया करण्याकरिता रुग्णाच्या उजवा पायाचे १५ सेंटिमीटर हाड काढण्यात आले व त्याद्वारे जबडा बनविण्यात आला. शस्त्रक्रिया करताना खालचा जबडा काढत असताना त्याबरोबर रुग्णाच्या खालच्या जबडय़ाचे सर्व दातही काढण्यात आले त्यानंतर तयार केलेला नवीन जबडा बसविण्यात आला. जबडा खराब झाल्यानंतर  या रुग्णास धातूची प्लेट बसवता आली असती, परंतु पुन्हा दात बसवणे शक्य झाले नसते त्यामुळे रुग्णाच्या पायाचे हाड काढून त्याद्वारे जबडा बनविण्यात आला. यापुढे या रुग्णाच्या जबडय़ात कृत्रिम दंतरोपण करण्यात येणार आहे असे डॉ. सिमीत शहा यांनी सांगितले.