सव्वा वर्षांची मुदत संपल्याने शिवसेनेचे मिलिंद कीर (रत्नागिरी) व काँग्रेसच्या वैशाली मांजरेकर (राजापूर) यांनी नगराध्यक्षपदांचे राजीनामे जिल्हाधिकारी राजीव जाधव यांच्याकडे सुपूर्द केले. त्यामुळे या रिक्त पदांवर कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वाचेच लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान राजापूरच्या नगराध्यक्षपदी काँग्रेसच्याच  नगरसेविका स्नेहा कुवेस्कर यांना संधी मिळणार असल्याची चर्चा पक्षीय गोटात सुरू आहे. तर रत्नागिरीच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपमध्ये सुंदोपसुंदी सुरू असून, माजी नगराध्यक्ष अशोक मयेकर, माजी उपनगराध्यक्ष महेंद्र मयेकर आणि महिला-बालकल्याण समितीच्या माजी सभापती प्रज्ञा भिडे यांच्यात रस्सीखेच सुरू असल्याचे भाजपच्या एका ज्येष्ठ कार्यकर्त्यांने सांगितले.
पाच वर्षांच्या सत्तेच्या कालावधीत जास्तीत जास्त नगरसेवकांना नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपद उपभोगता यावे, यासाठी निश्चित केलेल्या धोरणानुसार ही दोन्ही पदे आलटून-पालटून सव्वा-सव्वा वर्षांसाठी वाटून घेण्याचे ठरविण्यात आले असले तरी सव्वा वर्षांच्या या अल्प मुदतीसाठी बसलेली व्यक्ती या पदाला न्याय देईल किंवा नाही, तसेच या मुदतीत ती व्यक्ती शहर विकासाचा गाडा हाकील किंवा नाही, याचा कसलाही विचार हे धोरण निश्चित करताना केलेला दिसून येत नाही. तर केवळ कार्यकर्त्यांना खूश करण्यासाठीच राबविण्यात येणारे हे धोरण विकासालाच मारक ठरणारे आहे, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
सव्वा वर्षांपूर्वी झालेल्या रत्नागिरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीने २८ पैकी तब्बल २१ जागा जिंकून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा धुव्वा उडविला. आघाडीला केवळ ७ जागांवरच समाधान मानावे लागले होते.
 त्या वेळी महायुतीच्या नेत्यांनी ठरविलेल्या धोरणानुसार सव्वा वर्षांच्या पहिल्या टर्मसाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक मिलिंद कीर व भाजपचे महेंद्र मयेकर यांची अनुक्रमे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. सव्वा वर्षांची मुदत संपताच उपनगराध्यक्ष मयेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि त्यांच्या जागी शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रदीप ऊर्फ बंडय़ा साळवी यांची बिनविरोध निवड झाली. त्यानंतर गेल्या शुक्रवारी (८ मार्च) नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
आता पुढील सव्वा वर्षांसाठी नगराध्यक्षपद भाजपकडे जाणार आहे. मात्र या पदासाठी माजी नगराध्यक्ष अशोक मयेकर, माजी नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांच्यासह महिला-बालकल्याणच्या माजी सभापती प्रज्ञा भिडे इच्छुक असल्याने चुरस निर्माण झाली आहे. आता पक्षश्रेष्ठी कुणाच्या पारडय़ात आपले वजन टाकतात, याकडे रत्नागिरीवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.

राजापुरात काँग्रेसच्या कुवेस्कर
राजापूर नगर परिषदेच्या सभागृहात १७ पैकी १० काँग्रेस, २ राष्ट्रवादी, शिवसेना ३ व भाजप २ याप्रमाणे पक्षीय बल आहे. या नगर परिषदेत काँग्रेस पक्षाला बहुमत असल्याने पहिल्या सव्वा वर्षांच्या टर्मसाठी वैशाली मांजरेकर यांची नगराध्यक्षपदी निवड झाली. आता त्यांचा कार्यकाल संपल्याने त्यांनीही आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला आहे. त्यामुळे पुढील सव्वा वर्षांसाठी काँग्रेस पक्षाच्याच नगरसेविका स्नेहा कुवेस्कर यांना संधी देण्याचे निश्चित झाले असल्याचे एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे कुवेस्कर यांची नगराध्यक्षपदी निवड निश्चित असल्याचे मानले जाते.
नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष ही दोन्ही पदे महत्त्वाची असल्याने त्यावर आपली वर्णी लागावी, असे सर्वच नगरसेवकांना वाटत असते. याचा विचार करूनच ही दोन्ही पदे ‘खिरापती’सारखी वाटून काहींची नाराजी दूर करण्याचा पक्षश्रेष्ठींचा प्रयत्न असला तरी सव्वा वर्षांच्या अल्प मुदतीसाठी बसलेली कुणीही व्यक्ती त्या पदाला न्याय तर देऊच शकत नाही, तसेच त्याने विकासाबाबत घेतलेले निर्णय आणि धोरण, त्या पदावर बसणारी व्यक्ती तसेच पुढे चालू ठेवण्याची शक्यता नाही.
परिणामी शहर विकासाला चालना मिळण्याऐवजी विकासाचा गाडा रुतण्याची शक्यता आहे आणि म्हणून नगराध्यक्ष हे महत्त्वाचे पद सव्वा वर्षांऐवजी किमान अडीच वर्षांसाठी एकाच व्यक्तीकडे राहणे पक्षाच्या व शहरविकासाच्या दृष्टीने गरजेचे आहे, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.