नवी मुंबईत सिडकोने बांधलेल्या आणि गावठाणातील धोकादायक इमारतींना चार चटईक्षेत्र निर्देशांक देऊन त्यांच्या पुनर्विकासाबाबतचा निर्णय येत्या दोन महिन्यांत घेण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज विधानसभेत दिली.
झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाची व्याप्ती मुंबई महानगर प्रदेश विकास क्षेत्रापर्यंत वाढविण्याचे विचाराधीन असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी संदीप नाईक, जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीच्या उत्तरात सांगितले. सिडकोच्या जुन्या इमारती धोकादायक  झाल्या असून गावठाणातील इमारतींच्या पुनर्विकासासाठी चार चटईक्षेत्र निर्देशांक देण्याचा प्रस्ताव महापालिकेने शासनाकडे पाठविला होता. त्यावर महापालिकेला सुधारित प्रस्ताव पाठविण्यास सांगण्यात आले होते, असे नगरविकास खात्याचे राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी सांगितले. नवी मुंबई महापालिकेने नव्या प्रस्तावानुसार धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी २.५ तर मूळ गावठाण आणि विस्तारित गावठाणाच्या पुनर्विकासासाठी ४ चटईक्षेत्र निर्देशांक देण्याचा अंतिम प्रस्ताव शासनास पाठविला आहे. त्यावर संचालक नगररचना यांचा अभिप्राय मागविण्यात आला आहे.