विनायक बाळ

खरं तर तोपर्यंत कुणा कर्णबधिर व्यक्तीशी संपर्कही आला नव्हता रेखाताईंचा, परंतु अपघाताने त्यांना त्यांच्या शिक्षणाचं महत्त्व कळलं आणि त्या कर्णबधिर मुलांच्या प्रशिक्षणाकडे वळल्या. अशा मुलांना शिकवणं म्हणजे सहनशीलतेची मोठी कसोटीच! एका कर्णबधिर मुलाला सहा महिने त्या ‘आई’ हा शब्द शिकवीत होत्या. ज्या दिवशी त्यानं तो शब्द म्हटला तेव्हा रेखाताईंच्या डोळयांत अश्रू तरळले होते. रेखाताईंच्या आत्तापर्यंतच्या कामाचं हेच वैशिष्टय़ ठरलं आहे, त्यांच्याकडे आलेली सगळीच्या सगळी कर्णबधिर मुले व्यवस्थित बोलायला लागली आहेत. त्यातले कित्येकजण आजही त्यांच्याशी फोनवर संपर्क ठेवून आहेत. त्या आहेत, कर्णबधिर आणि गतिमंद व बहुविकलांग मुलांसाठी गेली ४१ वर्ष काम करणाऱ्या यंदाच्या दुर्गा, रेखा रवींद्र बागूल.

UP-Based Islamic Seminary Darul Uloom Deoband
“विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होतोय”, दारुल उलूम मदरशात महिलांना बंदी
Rambhau Ingole, Vimalashram,
विमलाश्रमच्या रामभाऊ इंगोले यांना आर्थिक मदतीची गरज, दानशूर व्यक्तींना आवाहन
AJit Pawar vs Supriya Sule
“मी त्यांचा मुलगा नसल्याने संधी मिळाली नाही”, अजित पवारांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, “माझी कारकीर्द…”
Ajit pawar on sharad pawars
“८४ वर्षांच्या योद्ध्याला तुम्ही लढायला लावताय”, अजित पवारांची शरद पवार गटाच्या नेत्यांवर टीका; म्हणाले “त्यांना बोलताना…”
Nagpur, Smartphones, parents,
‘पाल्यांच्या कोवळ्या मनातील सुप्त प्रश्नांची उत्तरे पालकांनीच शोधावी’
Chief Minister Eknath Shindes taunts to Naresh Mhaske attempt to comfort BJP leaders
मुख्यमंत्र्यांच्या नरेश म्हस्केंना कानपिचक्या, भाजप नेत्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न
Review of Mahesh Elkunchwars play Aatmakatha
‘ती’च्या भोवती..! सामान्याकडून असामान्याकडे!
ratnagiri sindhudurg lok sabha marathi news
रत्नागिरीत महायुतीपुढे कार्यकर्त्यांच्या मनोमिलनाचे आव्हान

 पुण्यातच माहेर असलेल्या पूर्वाश्रमीच्या या सुलभा लक्ष्मण भावे. वडील असिस्टंट पोलीस कमिशनर. घरात आठ बहिणी. वडील कामासाठी सतत बाहेर. खंबीर आणि शिस्तप्रिय आईच्या संस्कारातच त्या वाढल्या. त्यांनी अकरावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. त्याच वेळी उत्तम स्थळ चालून आलं आणि सुलभा भावे या रेखा बागूल झाल्या. पतीचा आग्रह होता त्यांनी पुढील शिक्षण घ्यावं, मात्र तीन मुलांच्या जन्मानंतर ते अवघड होत गेलं. शेवटी तडजोड म्हणून घरी राहून समाजशास्त्र पूर्ण करता येईल, म्हणून तो विषय घेतला. दरम्यान, त्यांच्या पतीची डोंबिवलीच्या कॉलेजमध्ये नियुक्ती झाली. इथंच आव्हानांच्या पर्वाला सुरुवात झाली. एकटय़ाने मुलींना सांभाळायचं, स्वत:चं शिक्षण पूर्ण करायचं म्हणजे कसरतच होती. अनेक प्रसंगांना सामोरं जात जात रेखाताईंनी बी.ए., एम. ए., बी. एड. तसंच ‘डिप्लोमा इन डेफ एज्युकेशन’ हे कर्णबधिरांसाठी आवश्यक शिक्षण घेतलं. दरम्यान, त्यांची ओळख कर्णबधिरांसाठी काम करणाऱ्या अंजली आगाशे यांच्याशी झाली आणि त्यांच्या जीवनानं एक भलं मोठं वळण घेतलं.

त्यानंतर, त्याही डोंबिवलीत स्थायिक झाल्या आणि कर्णबधिरांसाठी शाळा काढण्याचं निश्चित केलं. आपल्या मुलांच्या अशा शारीरिक कमजोरीची अजिबात माहिती नसणारे पालक झोपडपट्टीतच सापडणार याची खात्री असलेल्या रेखाताई आपल्या मैत्रिणींसह झोपडपट्टीत फिरू लागल्या. काही मुलं सापडलीही, पण त्यांना तिथे उर्मट उत्तरं मिळायची. पालक म्हणायचे, ‘कशाला पाठवायची शाळेत? ही मुलं काय डॉक्टर, इंजिनीअर होणार आहेत काय?’ त्यांची समजूत घालणं हे मोठं आव्हान होतं. पण तरीही जिद्दीनं त्यांनी आणि रंजना गोगटे, सुलभा टोकेकर यांनी ३० मुलांच्या पालकांना राजी केलंच. १९८२ मध्ये त्यांनी डोंबिवलीत ‘कर्णबधिर ज्ञानप्रबोधिनी’ ही शाळा सुरू केली. त्यावेळी शाळा झाडणं, मुलांची शी, शू धुणं, त्यांना शिकवणं सारं त्याच करीत. शाळा सुरू झाली खरी, पण जागामालक रजिस्ट्रेशनला परवानगी देईना. अखेर ‘अस्तित्व’ या त्यांच्या ओळखीच्यांनी उभ्या केलेल्या रजिस्टर संस्थेत ही मुलं समाविष्ट केली गेली. त्यांच्यासोबत होत्या आशा साठे, सुनीता दातार, ज्योती त्रलोक्य, मंजूषा पारखी, नीलिमा महाशब्दे, आशा करंदीकर आदी कार्यकर्त्यां.

त्यावेळी सहा वर्ष वयाच्या आधी मुलाला शाळेत प्रवेश नाही, हा नियम कर्णबधिर मुलांना अडचणीचा ठरू लागला. अशा मुलांना अगदी दीड-दोन वर्षांपासून शिकवणं सुरू केलं तर मोठा फायदा होतो, ते बोलू लागतात, हे रेखाताईंचं मत. या मुलांना सामान्य मुलांच्या शाळेत प्रवेश मिळणं सुरू झालं. पण अशा मुलांना वेगळं शिक्षण कसं मिळणार? हा प्रश्न रेखाताईंना सतावू लागला.  त्यांनी डोंबिवलीच्या आपल्या राहत्या घरीच ‘नचिकेत वाचा श्रवण प्रशिक्षण केंद्र’ सुरू केलं. तीसेक मुलं शिकत होती. मुंब्रा, टिटवाळा, शहापूर, वाशिंद अशा लांबून आलेल्या पालकांना वर्ग संपेपर्यंत तिथेच बसून राहण्याशिवाय पर्याय नव्हता.

इथे सगळं छान जमू लागलं. दोनेक वर्षांत मुलं चांगलं शिकून सामान्य मुलांच्या शाळेत शिकायला जात असत. त्यातलीच एक मयूरी आपटे. रसायनशास्त्र विषय घेऊन बीएस्सी झाली. ‘फूड अँड ड्रग अ‍ॅनॅलिस’चा पोस्टग्रॅज्युएट डिप्लोमा केला. त्यावेळी माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या हस्ते तिचा सत्कारही झाला. सगळं व्यवस्थित चालू असतानाच त्यांच्या निवृत्त पतीने शेती करण्याच्या उद्देशाने २००७ मध्ये दापोलीत स्थायिक व्हायचा निर्णय घेतला. तो रेखाताईंना फारच जड गेला. डोंबिवलीत उभं केलेलं विश्व सोडून नव्या जागी रुजायचं होतं. पण दापोलीतही अशा कामाची गरज होतीच. त्यांनी हेच काम तिथे नव्याने सुरू केलं.  तिथल्या ‘इंदिराबाई बडे मूकबधिर विद्यालया’त त्यांनी सुरुवातीला दहा वर्ष अध्यापनाचं काम केलं. येथील मुलांना ‘१७ क्रमांकाचा फॉर्म’ भरून त्या दहावीला बसवत होत्या. ते काम आजही सुरू आहेच. या शाळेत त्या सध्या सचिव म्हणून काम करत असून सध्या तेथे तीस मुलं शिकत आहेत.

समाजातल्या विकलांग मुलांची वाढती संख्या आणि त्यांना असलेली मदतीची गरज लक्षात घेऊन १५ ऑगस्ट २०२१ पासून रेखाताईंनी ‘आनंद फाउंडेशन संचालित गतिमंद आणि बहुविकलांग मुलांचे शिक्षण आणि पुनर्वसन केंद्र’ जालगांव इथं सुरू केलं. तेथे १९ अनिवासी, तर ११ मुलं इथं निवासी पद्धतीनं राहतात. तळमळीने काम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांच्या मदतीने आणि समाजातील दानशूर व्यक्तींच्या मदतीने आज वयाच्या सत्तरीतही त्या हे काम करत आहेत. कौटुंबिक हिंसाचारग्रस्त स्त्रियांना मदत करणं, पीडित, दिव्यांगांना न्याय मिळवून देणं हेही त्यांचे काम चालू आहेच.

रेखाताईंची खरी खंत आहे, पालक आपलं मूल विशेष आहे हे मान्य करायला सहज तयार होत नाहीत. त्यांची समजूत घालणं मोठं आव्हानात्मक ठरतं. या क्षेत्रात तरुणांनी यावं आणि आपली सेवा द्यावी, असं आवाहन त्या करतात. कारण शारीरिक, मानसिक, आर्थिक क्षमतांची या क्षेत्रात कसोटी लागत असली तरी मिळणारा आनंदही तेवढाच मोठा आहे, असं त्या आवर्जून सांगतात. त्यांच्या या कामाला आणि भविष्यातील कामांनाही खूप शुभेच्छा!

रेखा बागूल

अपघातानेच कर्णबधिर मुलांच्या प्रशिक्षणाकडे वळलेल्या रेखाताई. पण हळूहळू या कामाचं महत्त्व इतकं वाढत गेलं, की त्यांचं काम फक्त कर्णबधिरांपर्यंत मर्यादित न राहता गतिमंद आणि त्याही पुढे जाऊन बहुविकलांग मुलांपर्यंत पोहोचलं. सुरुवातीला डोंबिवलीत आणि आता दापोलीत ‘आनंद फाउंडेशन संचालित गतिमंद आणि बहुविकलांग मुलांचे शिक्षण आणि पुनर्वसन केंद्र’ ही निवासी शाळा त्या चालवत आहेत. त्या आहेत,  कर्णबधिर आणि ‘गतिमंद व बहुविकलांग’ मुलांसाठी गेली ४१ वर्ष काम करणाऱ्या यंदाच्या दुर्गा, रेखा बागूल.