लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर तीन वाहनांच्या झालेल्या विचित्र अपघातात एका अकरा वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी अंत झाला. भोसे (ता. मिरज) सोमवारी दुपारी झालेल्या या अपघातानंतर संतप्त जमावाने एका वाहनावर दगडफेक करून काचा फोडल्या.

याबाबत माहिती अशी, ट्रॅक्टर (एमएच १० डीव्ही ०६८९) सांगोल्याकडून मिरजेकडे येत होता. याचवेळी याच मार्गाने पॅगो रिक्षाही (एमएच ११ एजी २५८७) येत होती. यातून विट भट्टीवर काम करणारे पाच जणांचे कुटुंब प्रवास करत होते. पॅगो रिक्षा समोर असलेल्या ट्रॅक्टरच्या पुढे जाण्याच्या प्रयत्नात असतानाच मागून आलेल्या मिनी टेम्पोने (एमएच ११ बीएल ६१६५) धडक दिली. यामुळे पॅगो रिक्षातून प्रवास करत असलेला अमित शुभांगी जगन्नाथ पवार (वय १० रा. गोपाळवस्ती, अजिंठा चौक,सातारा) हा खाली रस्त्यावर पडला. या दरम्यानच मागून आलेल्या मिनी टेम्पोचे चाक त्याच्या डोकीवरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

आणखी वाचा-गुजरातच्या जीएसटी आयुक्तांनी साताऱ्यात ६२० एकर जमीन विकत घेतली, पण कुणालाच पत्ता नाही! महाराष्ट्रातील धक्कादायक प्रकार उघड

अपघातानंतर घटनास्थळी लोकांची गर्दीही जमली. लहान मुलाचा मृत्यू झाल्याचे पाहून जमाव संतप्त झाला. संतप्त जमावाने मिनी टेम्पोवर दगडफेक करत वाहनाचे नुकसानही केले. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पोलीस विभागाचे उप निरीक्षक युवराज पाटील यांच्यासह वाहतूक पोलीस, मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली.