ऑनलाइन रमीच्या व्यसनातूनच सचिन तेंडुलकरच्या अंगरक्षकाची आत्महत्या झाल्याचा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. “ऑनलाइन गेममुळे तेंडुलकर यांच्या अंगरक्षकानं आत्महत्या केली. हे निषेधार्थ आणि संताप आणणारं आहे. सचिन तेंडुलकर यांनी ऑनलाइन रमीची जाहीरात बंद करावी किंवा भारतरत्न पुरस्कार सोडावा. नाही तर ६ जून शिवराज्यभिषेक दिनाच्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी ७ जून सचिन तेंडुलकर यांच्या घरासमोर त्यांचा पुतळा जाळून आंदोलन करणार”, असे आव्हान बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा दिले आहे. याआधीही बच्चू कडू यांनी सचिन तेंडुलकरच्या विरोधात आंदोलन केले होते.
बच्चू कडू माध्यमांशी बोलताना म्हणाले की, जो अंगरक्षक सचिन तेंडुलकरचे जीव वाचविण्याचे काम करत होता, त्याच अंगरक्षकाला सचिन करत असलेल्या जाहिरातीमुळे जीव गमवावा लागला आहे. अंगरक्षकाला आत्महत्या करायची वेळ अली असेल तर सचिन तेंडुलकरने ही जबाबदारी उचलली पाहीजे. ज्याला भारतरत्न म्हणून आपण गौरविले, त्याच्या जाहिरातीमुळे अशी आत्महत्या करावी लागत असेल तर हे दुर्दैव आहे.
सचिन तेंडुलकरच्या सुरक्षा व्यवस्थेतील जवानाची आत्महत्या – जामनेरमधील घटना
भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या सुरक्षा व्यवस्थेतील राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) अंगरक्षक जवानाने १५ मे रोजी पहाटे जामनेर येथील निवासस्थानी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली होती. गेल्या १५ वर्षांपासून राज्य राखीव पोलीस दलाच्या सेवेत असलेले प्रकाश कापडे (३९) यांनी याआधी मंत्री छगन भुजबळ, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडेही सुरक्षाव्यवस्थेतील अंगरक्षक म्हणून काम केले होते. सध्या ते सचिन तेंडुलकरच्या मुंबई येथील निवासस्थानी सुरक्षाव्यवस्थेत अंगरक्षक म्हणून तैनात होते. आठवडाभरापूर्वी ते जामनेर येथील गणपतीनगर भागातील आपल्या निवासस्थानी परतले होते.
कापडे यांनी आत्महत्या केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर आणइ तपासानंतर कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले होते. कापडे यांच्यामागे आई-वडील, पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे. कापडे हे गोरेगाव (मुंबई) येथे राज्य राखीव पोलीस दलात (एसआरपीएफ) प्रतिनियुक्तीवर कार्यरत होते.
बच्चू कडू लोकसभा निवडणुकीबाबत बोलताना म्हणाले की, ही निवडणूक धर्मयुद्धासारखी लढली गेली. धर्म आणि जातीच्या नावावर निवडणुका लढल्या जात आहेत. सर्व मतदारसंघावर नजर मारली तर जातीचे गणित मांडण्याचा प्रयत्न झालेला दिसतो. काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांनी हा प्रयत्न केला. मुळ मुद्द्यांपासून ही निवडणूक दूर गेली आहे. आजही मुंबईत सहा ते सात लाख लोकांना फुटपाथवर झोपावं लागतं आणि ६ हजार एकर जमीन सहा कुटुंबाकडे आहे. हा मुद्दादेखील निवडणुकीत यायला हवा होता. पण तो आला नाही. या विषयावर जून महिन्यात गोदरेजच्या मैदानावरच आंदोलन करणार आहोत.
गोदरेज कुटुंबियांना ही जमीन ब्रिटिशांकडून मिळाली होती. त्यांनी ती जमीन सरकार दरबारी जमा करावी, अन्यथा बेघरांना घर मिळावे, यासाठी आम्ही आंदोलन करू, असे सुतोवाच बच्चू कडू यांनी केले.