प्रख्यात चित्रकार शिवाजी तुपे यांचे गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते मूत्रपिंडाच्या आजाराने आणि ह्रदयविकाराने त्रस्त होते. आजारपणामुळेच त्यांना गेल्या आठवड्यात रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली.
शिवाजी तुपे यांचा जन्म १९३५ मध्ये झाला. लहानपणापासूनच त्यांना चित्रकलेची आवड होती. घरातच कलेचा वारसा असल्यामुळे तिथेच त्यांच्यावर चित्रकलेचे संस्कार झाले. जे. जे. उपयोजित कला महाविद्यालयातून त्यांनी शिक्षण घेतले होते. लॅण्डस्केप्स हे त्यांच्या चित्रांचे वैशिष्ट्य होते. जवळपास ५० वर्षांपासून ते लॅण्डस्केप्स करीत होते. तुपे यांच्या स्वतःच्या चित्रांची ३० पेक्षा अधिक प्रदर्शने भरविण्यात आली होती. ललित कला अकादमी, बॉम्बे आर्ट सोसायटी यांनी भरविलेल्या प्रदर्शनांमध्येही तुपे यांनी सहभाग घेतला होता.
नाशिकचे वा. गो. कुलकर्णी यांनी स्थापन केलेल्या नाशिक कला निकेतन या संस्थेशी १९६० ते ९८ या काळात अध्यापक या नात्याने तर पुढे सचिव म्हणून ते कार्यरत होते. ‘स्केच करता करता’ आणि ‘स्केचबुक’ ही त्यांची दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत.