मराठीतली प्रसिद्ध अभिनेत्री आसावरी जोशी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. बिग बॉसची विनर शिल्पा शिंदे पाठोपाठ आसावरी जोशी यांनीही राजकारणात एंट्री घेतली आहे. आसावरी जोशी या काँग्रेसमध्ये सहभागी होणार आहेत हे काही दिवसांपूर्वीच स्पष्ट झाले होते. आज मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

अभिनेत्री आसावरी जोशी या हिंदी आणि मराठी सिने आणि मालिका वर्तुळातलं एक प्रसिद्ध नाव आहे. त्यांनी अनेक हिंदी मराठी सिनेमा आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. आता काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यावर त्यांची राजकारणातली नवी इनिंग सुरु झाली आहे. आसावरी जोशी, शिल्पा शिंदे यांनी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने त्या निवडणुकांच्या रिंगणात उतरणार की स्टार प्रचारक होणार हे आता स्पष्ट होणार आहे. मात्र काँग्रेस या दोघींच्याही लोकप्रियतेचा फायदा करून घेणार यात शंका नाही.

माझ्यासोबत जे कार्यकर्ते काम करतील ते सर्वधर्मभाव मानणारे लोक असतील. आत्ताच्या घडीला सर्वधर्मसमभाव मानणारा पक्ष काँग्रेस आहे असं मला वाटतं म्हणून मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असं आसावरी जोशी यांनी म्हटलं आहे. तसंच तुम्ही निवडणूक लढवणार का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला तेव्हा आता राजकारणात आले आहे, रिंगणात उतरले आहे तर लढल्याशिवाय काय मजा? लढणार असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं आहे. लोकसभेची निवडणूक लढवायला मला आवडेल माझी तशी इच्छा आहे असं आसावरी जोशी यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. मात्र याबद्दलचा निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील असंही त्या म्हटल्या आहेत.