हेरिटेज पर्यटनाच्या नावाखाली गडकिल्ल्यांचं व्यावसायिकरण केलं जातंय अशा शब्दांत अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी महाराष्ट्रातील २५ किल्ले हेरिटेज हॉटेल, लग्नसमारंभासाठी भाड्याने देण्याच्या फडणवीस सरकारच्या निर्णयावर टीका केली आहे. ”किल्ल्यांचं संवर्धन करणं ही आपली जबाबदारी आहे. त्यांच्या संवर्धनाची जबाबदारी कोणत्याच सरकारने मनावर घेतली नाही,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

राज्यातील किल्ल्यांचं हेरिटेज हॉटेलमध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून (एमटीडीसी) अशा २५ किल्ल्यांची यादी काढण्यात आली आहे. हे किल्ले करारावर हॉटेल व्यवसायिकांना रिसॉर्ट तसंच हॉटेल उभारण्यासाठी देण्यात येणार आहेत. हे गड- किल्ले फक्त हॉटेलच नाही तर लग्नसमारंभ आणि करमणुकीच्या कार्यक्रमासाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे.

याविषयी रेणुका शहाणे म्हणाल्या, ”पर्यटन स्थळ म्हणून गडकिल्ल्यांचा विकास करू शकतो पण त्यांचं हॉटेलीकरण करणं खूप चुकीचं आहे. राजस्थानमधील अनेक किल्ले हेरिटेज हॉटेल केल्यानंतर उत्तमप्रकारे त्यांचं संवर्धन केलं गेलं. पण त्यातही कुठेतरी व्यावसायिकरण येतंच की. किल्ल्यांचा आपल्याला गर्व आहे आणि त्यांचं अशाप्रकारे व्यावसायिकरण करणं चुकीचं आहे. जे होतंय ते बरोबर होतंय असं मला नाही वाटत.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गडकिल्ल्यांचं रुपातंर हेरिटेज हॉटेलमध्ये झाल्यास काय होणार याबद्दल त्या पुढे म्हणाल्या, ”जरी किल्ल्यांवर हॉटेल उभारले तरी ते सामान्यांना कुठे परवडणार? उच्चभ्रू लोकंच तिथे जाऊ शकतील. म्हणजे सामान्यांना दूर ठेवण्यात येईल.”

सरकारने या निर्णयाचा पुनर्विचार करावा असं मत त्यांनी मांडलं. याविरोधात जर अनेकजण बोलत असतील तर सरकारने त्याचा पुनर्विचार करावा. कारण आपल्याला पैसे मिळो किंव न मिळो पण गडकिल्ल्यांचं संवर्धन करणे ही आपली सर्वांत मोठी जबाबदारी आहे, असं त्या म्हणाल्या.