भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्य नगरी, उदगीर : पर्यावरणीय लेखनात संशोधन करून ते लोकांसमोर मांडण्याची मराठी साहित्यिकांची वृत्ती नाही, असे परखड मत ज्येष्ठ पत्रकार आणि पर्यावरणाचे अभ्यासक अतुल देऊळगावकर यांनी व्यक्त केले. ९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शनिवारी ‘मराठी साहित्यात निसर्गचित्रणच आहे, पर्यावरण नाही’ या विषयावरील परिसंवादात अध्यक्षपदावरून ते बोलत होते. यावेळी कोल्हापूरचे गोमटेश्वर पाटील, औरंगाबादचे अनिरुद्ध मोरे, प्रा. डॉ. किरण वाघमारे, डॉ. अनिता तिळवे तसेच संमेलनाचे स्वागताध्यक्ष ना. संजय बनसोडे व्यासपीठावर होते.
देऊळगावकर म्हणाले, संतांचा फक्त जयघोष आणि उदोउदो करण्याची मराठी साहित्यिकांची वृत्ती आहे. हे एक प्रकारचे थोतांड आहे, प्रत्यक्षात त्यांच्या विचारांचे अनुकरण कुणीच करत नाहीत. जगभरातील कॉर्पोरेट कंपन्या तर यात आघाडीवर आहेत. आपल्या प्रगतीच्या व्याख्येतच काहीतरी खोट आहे. मराठी साहित्यिक निसर्ग आणि पर्यावरण या विषयावर लिहिताना केवळ स्वत:च्या अनुभवाचा आणि जीवनाचा विचार करतो, त्यापलीकडे जाऊन पर्यावरणावर संशोधनात्मक लिखाण होत नाही. परखड असले तरी सत्य हेच असल्याचे ते म्हणाले.




गोमटेश्वर पाटील म्हणाले, जगभरातील आणि मराठी साहित्यात सौंदर्यवाद आहे, परंतु निसर्गवाद नाही. अनिरुद्ध मोरे म्हणाले की, झाडाला देवत्व देण्याची गरज नसून, त्यांची आपल्याला जैविक गरज आहे. मराठी साहित्यात निसर्गाचा उल्लेख आहेच, मात्र तो पर्यावरणीय जाणिवेतून होण्याची गरज आहे. प्रा. डॉ. किरण मोरे म्हणाले, मराठी साहित्यात निसर्गाचे चित्रण आहे, तसेच ते पर्यावरणाचेही आहे, मात्र त्याकडे आपले लक्ष जात नाही. डॉ. अनिता तिळवे यांनी भारतीय संस्कृतीतील पर्यावरण आणि झाडांचे महत्त्व अधोरेखित केले.
प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता कुणी संपवली?; प्रा. जयदेव डोळे यांचा सवाल
भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्य नगरी, उदगीर : ज्यांच्या हाती देश आहे त्यांच्याकडेच पाहा. त्यांनी आठ वर्षांत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला का? मग विश्वासार्हता कुणी संपवली? तुम्ही की आम्ही? तुम्हीच बोलत नाही, तुम्हीच ते ठरवलंय की ही प्रसारमाध्यमे विश्वासार्ह नाहीत. ही गळचेपी कोण करतंय, असा थेट प्रश्न करत ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत प्रा. जयदेव डोळे यांनी प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता याचमुळे कमी होत आहे, असे परखड विचार व्यक्त केले. ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‘प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता आज शून्यावर येऊन ठेपली आहे! या विषयावर प्रा. जयदेव डोळे यांच्या अध्यक्षतेत परिसंवाद झाला. यावेळी ते बोलत होते. या परिसंवादात जयप्रकाश दगडे, श्रीपाद अपराजित, धनंजय भिसे, नम्रता वागळे, अरुण समुद्रे, प्रदीप नणंदकर, दत्ताहरी होनराव सहभागी झाले होते. यावेळी डोळे म्हणाले, वृत्तपत्राला जगण्यासाठी सगळ्य़ाच गोष्टी कराव्या लागतात. मग विश्वासार्हतेचा प्रश्न येतोच कुठे? वृत्तपत्रात अनेक गोष्टी आहेत. खप संपतोय. मालकांना ते चालवणे कठीण झालेय. जगण्यासाठी काही तडजोडी कराव्या लागतात, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. नम्रता वागळे म्हणाल्या, डिजिटल माध्यमांचा सुळसुळाट झालाय. त्यामुळे काही अंशी प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता धोक्यात आली आहे, पण संपलेली नाही.