सत्तेला माज चढला की साहित्यावर निर्बंध लादले जातात. आज साहित्यात सत्ताधाऱ्यांना चिअर्स करणारे अनेक चिअर्स लीडर्स तयार झाले आहेत. हे चिअर्स लीडर्स सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या कृतीलाही प्रोत्साहन देत आहेत, असे परखड मत ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोकणी साहित्यिक दामोदर मावजो यांनी व्यक्त केले.

संमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. मावजो म्हणाले, चिरंतनाला धक्के देणारे साहित्य कालानुरूप असते. आवडत नसलेले साहित्य जाळणे, त्यावर बंदी घालणे योग्य नाही. इंदिरा गांधी यांच्या काळात आणीबाणीला साहित्यिकांनी प्रखर विरोध केला. आज तसे धाडस करताना कुणी दिसत नाही, हे फारच वेदनादायी आहे. लेखक कधीच घाबरट असू नये. तो कायम बंडखोरच असला पाहिजे. मला वाद नव्हे; संवाद आवडतो. मी कोकणी भाषक, कोकणीत लिहितो. मराठी लेखक आणि आपल्यात कधीच भाषावाद आला नाही. कोकणी व मराठीत द्वेष नको, वाद नको. पुढचे संमेलन गोव्यात घ्या. सहकार्य करू. सर्व वाद संवादातूनच मिटतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

अभिजात दर्जासाठी राजकीय इच्छाशक्ती हवी : अशोक चव्हाण</strong>

मराठवाडा ही संतांची आणि चळवळीची भूमी आहे. मराठवाडय़ात तेलगू, उर्दू, कन्नड, मराठी भाषा बोलल्या जात असल्या तरी येथे मराठी भाषेचा दबदबा आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे, असे मत सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले.

डिजिटल रूपात साहित्य निर्माण व्हावे : शिवराज पाटील

साहित्य हे व्यावहारिक, आध्यात्मिक आणि वैज्ञानिक अशा विविध पद्धतीचे असू शकते. इतर भाषांतील ग्रंथ मराठीत यावेत. कुराण, बायबल, उपनिषदे यांसारखी अजरामर साहित्य निर्माण व्हावीत. येणारा काळ हा डिजिटल आहे. त्यामुळे डिजिटल स्वरूपात साहित्य निर्माण व्हावे, असे मत माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी व्यक्त केले.