प्रेमात असलेले प्रेमवीर भावनेच्या आहारी जाऊन आपली प्रणय दृश्य रेकॉर्ड करतात, आपल्या जोडीदाराला नग्न फोटो पाठवतात. मात्र जेव्हा या प्रेमवीरांचा,जोडप्याचा प्रेमभंग होतो तेव्हा मात्र सुडाने पेटलेल्या या प्रेमवीरांकडून याच व्हिडिओ, फोटोचा गैरवापर केला जातो आहे. यातूनच पुढे आलेला प्रकार म्हणजे रिव्हेंज पॉर्न. रिव्हेंज पॉर्नचे व्हिडिओ खामगावात व्हायरल होत आहेत. या सगळ्या प्रकारांवर पोलिसांच्या सायबर विभागाची करडी नजर आहे.
खामगावात काय घडतं आहे?
खामगावात सध्या रिव्हेंज पॉर्नचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. हे व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांचा शोध पोलीस प्रशासन, सायबर विभागाच्या वतीने घेत आहे. प्रेमभंग झाल्याने पूर्वाश्रमीच्या प्रेयसीचे फोटो, व्हिडीओ व्हायरल करणे, नकार देणाऱ्या जोडीदाराला अद्दल घडवण्यासाठी, सूड उगवण्यासाठी रिव्हेंज पॉर्नचा वापर होतो आहे. ज्यावर सायबर विभागाची करडी नजर आहे.
प्रेमात असताना भावनेच्या आहारी जाऊन रेकॉर्ड केलेली प्रणयदृष्यं, एकमेकांना पाठवलेले नग्न, अर्धनग्न फोटो, व्हिडिओ बदनामी करण्याच्या उद्देशाने पॉर्न साईटवर टाकण्यात येतात किंवा सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत. एकमेकांना बदनाम करण्यासाठी मार्गाचा अवलंब करणं याला सायबरक्राईमच्या भाषेत म्हणतात ‘रिव्हेंज पॉर्न’. रिव्हेंज पॉर्नच्या गुन्ह्यांनी सध्या खामगावात प्रचंड धुमाकूळ घातलाय.
बुलढाणा जिल्ह्यातील पोलिसांच्या सायबर क्राईम सेलकडे अशा तक्रारी प्राप्त झाल्यापासून खामगाव पोलीस अशाचा शोध घेत आहेत. दरम्यान, कुणाचे प्रायव्हेट तथा पॉर्न व्हिडिओ बाळगणे व्हायरल करणे कायद्याने गुन्हा असून, खामगावात अशा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या संदर्भात तक्रार प्राप्त झाली असून, त्या तक्रारीच्या अनुषंगाने सायबर विभागाची मदत घेतल्या जात आहे. लवकरच असे व्हिडिओ व्हायरल करणारे जेरबंद केले जातील असा इशारा खामगाव चे अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनी दिला आहे.