करोनाला हरवायचे असेल तर घरात राहणे जेवढे अनिवार्य आहे, तेवढेच सरकारने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणेही आवश्यक आहे. दैनंदिन कामे करतानाही त्याचे भान असायला हवे. अलिबागमधील  रेवस कोळीवाड्यात महिलांना या नियमांचे भान असल्याचे पहायला मिळाले आहे. सार्वजनिक विहरीवर पाणी भरतानाही नियमांचे काटेकोर पालन करून रेवस कोळीवाड्यातील महिलांनी एक आदर्श घालून दिला आहे.

अलिबाग तालुक्यातील रेवस हा जवळपास 900 ते 1000 लोकवस्तीचा गाव आहे. या गावात पाणी प्रश्न पाचवीला पूजला आहे. लोकसंख्येच्या तुलनेत अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे  तहान भागत नसल्याने येथील महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. बर्‍याचदा पिण्यासाठी विकतचे पाणी घ्यावे लागते.

करोनामुळे सध्या राज्यात परिस्थिती गंभीर आहे.  या पार्श्वभूमीवर येथील  गावकरी देखील सजग झाले आहेत. येथील मराठी शाळेसमोर एक हौद वजा विहीर आहे. यामध्ये  बोअरवेलचे पाणी सोडले जाते. सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास असा पाणी पुरवठा केला जातो. पाणी भरण्यासाठी यापूर्वी एकच झुंबड उडायची त्यातून वादही निर्माण होत होते. परंतु करोनाच्या पार्श्वभूमीवर आता याच ठिकाणी पाणी भरण्यास येणाऱ्या महिलांकडून  ‘सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे पालन होताना दिसत आहे.

किमान एक मीटर अंतरावरून एकमेकांशी संवाद साधला जात आहे. गावकर्‍यांनी या विहीरीच्या समोर विशिष्ट अंतरावर चौकोन आखून दिले आहेत. या चौकोनात कोळी वाड्यातील महिला उभ्या राहून एकावेळी सुरक्षित अंतर राखत केवळ पाचच महिला विहीरीवर पाणी भरण्यासाठी जात आहेत.  त्यामुळे पाणी भरताना अंतरही राखले जाते आणि वादही होत नसल्याचे समाधान महिला व्यक्त करत आहेत. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे कोळीवाड्यात काटेकोपरणे पालन होत असून पाणी भरतानाही आम्ही त्याचे भान ठेवतो, असे जस्मिता कोळी, वैशाली कोळी, दिपमाला कोळी यांनी सांगितले.

एकीकडे काही शहरांमधून संचारबंदीचा फज्जा उडत असतानाच ग्रामीण भागात मात्र संचारबंदी बर्‍यापैकी पाळली जाते. लोक नियमांचे पालन करतात, असे सकारात्मक चित्र पहायला मिळत आहे. रेवस कोळी वाड्यातील या महिलांनी तर घालून दिलेला हा आदर्श कौतुक करण्यासारखा आहे.