राज्यात नैसर्गिक मृत्यूनंतर सर्वाधिक मृत्यू हे रस्ते अपघातात होत असतात आणि या अपघातामधे दर वर्षी जवळपास १२ हजार प्रवाशांचा मृत्यू होत असतो. त्यामुळे रस्त्यावरील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्यभरात रस्ता सुरक्षा अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. समाजप्रबोधनाच्या माध्यमातून रस्ता सुरक्षेचे महत्त्व लोकापर्यंत पोहचवण्याचे कार्य या माध्यमातून केले जाणार आहे.
राज्यात दरवर्षी सरासरी १२ हजार लोकांचा अपघातामध्ये मृत्यू होतो. तसेच या अपघातामधे मृत्युमुखी पडणाऱ्या ८० टक्के लोकांचे वय हे साधारणपणे १८ ते ३० वयोगटातील असते. राज्यातील तरुण मनुष्यबळ जर येवढय़ा मोठय़ा प्रमाणात अपघातात नष्ट होत असेल तर ती राज्याच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. त्यामुळे आता रस्ता सुरक्षेचे महत्त्व लोकांना कळावे यासाठी राज्यभर रस्ता सुरक्षा अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. केवळ वाहतूक नियमांची कठोर अंमलबजावणी करणे हा या मोहिमेचा उद्देश न ठेवता समाजप्रबोधनातून रस्ता सुरक्षेचे महत्त्व लोकांना पटवून द्यावे हा या मोहिमेचा उद्देश असल्याचे पेण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी बाबासाहेब आजरी यांनी सांगितले आहे. १ जानेवारी ते १५ जानेवारीदरम्यान साजऱ्या केल्या जाणाऱ्या या रस्ता सुरक्षा सप्ताहात विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. शाळा व कॉलेजेसमधून मुलांचे प्रबोधन करणे, वाहतुकीचे नियम व त्याचे महत्त्व मुलांना समजावून सांगणे, शाऴांमधील परिवहन समित्यांची बैठक घेणे, स्कूल बसेसची तपासणी करणे व मार्गदर्शन करणे यांसारखे उपक्रम राबविले जाणार आहेत. मुलांच्या तसेच वाहनचालकांच्या प्रबोधनासाठी पेण उपप्रादेशिक कार्यालयाने वाहतुकीची पाठशाळा नावाचे एक पुस्तकही तयार केले आहे. या सप्ताहादरम्यान वाहनचालकांची नेत्रतपासणी व रक्तदाब चाचणी केली जाणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात वाहतूक नियमाची कठोर अंमलबजावणी केली जाणार आहे. यात हेल्मेट आणि सिटबेल्ट यांची तपासणी करणे, अवैध प्रवासी वाहतूक रोखणे, मद्यपान करून गाडय़ा चालवणाऱ्या चालकांवर कारवाई करणे आणि जादा मालवाहतूक करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करणे यांसारखे उपक्रम हाती घेतले जाणार असल्याचे आजरी यांनी सांगितले.
याशिवाय शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाहतुकीचे नियम व रस्ता सुरक्षेचे महत्त्व पटवून देण्यासाठी शिक्षण विभागाच्या मदतीने १० तारखेला पेण इथे चित्रकला स्पर्धा, ११ तारखेला माणगाव इथे निबंध स्पर्धा तर १२ तारखेला अलिबाग इथे वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले जाणार असल्याचे आजरी यांनी सांगितले आहे.